अंबेजोगाईत योगेश्वरी मंदिरात 50 तोळे दागिन्यांची चोरी

April 18, 2012 4:56 PM0 commentsViews: 60

माधव सावरगावे, अंबेजोगाई

18 एप्रिल

बीड जिल्हात अंबेजोगाईच्या योगेश्वरी मंदिरात काल पहाटे दरोडा पडला. देवीचे सुमारे 50 तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याचे पुजार्‍यांनी सांगितले आहे. दरोडेखोरांनी रात्री मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची केबल कापली आणि दागिने चोरले. पुजार्‍यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र ते सापडले नाहीत. पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी पाच पथकं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले आहे. दरम्यान, या घटनेनंतर अंबेजोगाईतली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

दिवेआगरच्या चोरीला एक महिना उलटत नाही.. तोच अंबेजोगाईच्या मंदिरातही दरोडा पडला. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईचं ग्रामदैवत असलेल्या योगेश्वरी देवीच्या 50 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेलेत. यामध्ये देवीच्या अंगावरील सर्व सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरीला गेले आहे. देवीचे डोळे,कानआणि मुख हे सोन्याचे बनवले होते. ते सुध्दा चोरांनी सोडले नाहीत. शिवाय देवीच्या चांदीच्या पादुकांचीही चोरी केली. यात किमान 70 तोळे सोनं असल्याची शक्यता आहे मात्र पोलिसांच्या तक्रारीत 35 तोळे सोनं चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली.

या ऐतिहासिक मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे होते मात्र त्याची केबल सुध्दा चोरांनी कापली. घटनेनंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं. राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पोलिसांची शोधपथकं पाठवण्यात आली आहेत.

अंबेजोगाईमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अंबेजोगाई शहर बंद ठेवण्यात आलंय. पोलिसांनी लवकरात लवकर चोरांना पकडलं नाही तर बेमुदत उपोषण करु असा इशारा स्थानिकांनी दिला.

दिवेआगारची ऐतिहासिक गणेश मूर्ती चोरणारे अजूनही पकडले गेले नसताना.. हा प्रकार घडल्याने राज्यात देवही सुरक्षित नाही, अशी भावना लोकांनी व्यक्त केली.

close