पंजाबच्या वाघांना गेलचं आव्हान

April 20, 2012 11:03 AM0 commentsViews: 1

20 एप्रिल

आयपीएलमध्ये शुक्रवारी बलाढ्य बंगलोर रॉयलचा मुकाबला असेल तो किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर. ही मॅच मोहालीत खेळवली जाणार आहे. मॅच घरच्या मैदानावर होणार असली तरी किंग्ज इलेव्हनसमोर प्रमुख आव्हान आहे ते ख्रिस गेल नावाचं वादळ कसं रोखायचंय याचं.. ख्रिस गेल नावाचं वादळ मैदानावर आलं की समोरच्या टीमची काय अवस्था होते हे गेल्या मॅचमध्ये दिसून आलं. पुणे वॉरिअर्सविरुध्दच्या मॅचमध्ये अवघ्या 48 बॉलमध्ये धडाकेबाज 81 रन्सची त्याची खेळी क्रिकेटप्रेमींच्या चांगलीच लक्षात राहिली. राहुल शर्माच्या एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर जमा झाला आहे. गेलच्या साथीला विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स आणि तिलकरत्ने दिलशान असल्यामुळे बंगलोरची बॅटिंग ऑर्डर चांगलीच भक्कम बनली आहे. तर बॉलिंगमध्ये झहीर खान आणि विनय कुमारवर टीमचा मदार आहे.

बंगलोरची टीम भक्कम वाटत असली तरी यंदाच्या हंगामात त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण झालेली नाही. पाच पैकी तब्बल 3 मॅचमध्ये बंगलोरला पराभव पत्करावा लागला. पण आता ख्रिस गेल पुन्हा फॉर्मात आल्यानं बंगलोरचं पारडं जड आहे.

साहजिकच किंग्ज इलेव्हनसमोर पहिलं आव्हान असेल ते गेलला झटपट आऊट करण्याचं. किंग्ज इलेव्हनची अवस्थाही काहीशी बंगलोर टीमसारखीच आहे. पाचपैकी तीन मॅचमध्ये किंग्ज इलेव्हनला पराभव पत्करावा लागला आहे. कॅप्टन ऍडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्श वगळता पंजाबच्या इतर बॅट्समनना विशेष कामगिरी करता आलेली नाही. तर दिमित्री मस्कार्‍हेनेस आणि पियुष चावला शिवाय टीममध्ये विकेट टेकल बॉलर्स नाहीत.

दोन्ही टीम पॉईंटटेबलमध्ये सध्या तळाला आहेत आणि दोन्ही टीमला यापुढे पराभव परवडणारा नाही. त्यामुळे ही मॅच बंगलोर आणि पंजाबसाठी तितकीच महत्वाची ठरणार आहे.

close