पुण्यात बीआरटीच्या मार्गावर उड्डाणपुलाचा घाट

April 20, 2012 11:39 AM0 commentsViews: 11

20 एप्रिल

पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असतानाच राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या नियोजन शून्य भोंगळ कारभारामुळे पुणेकरांच्या त्रासात भरंच पडतेय. पुणे सातारा रस्त्यावरील बी.आर.टीच्या पायलट प्रोजेक्ट मार्गावर आता उड्डाणपुलाचा घाट घातला जातोय. या उड्डाणपलाचे काम तब्बल 3 वर्षं चालणार असल्याने बी.आर.टी चा मार्ग उखडला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीलाही पुणेकरांना तोंड द्यावं लागणार आहे.

मोठा गाजावाजा करत 2007 साली देशात सर्वात आधी पुण्यात बी.आर.टी योजना सुरू करण्यात आली. स्वारगेट ते कात्रज आणि स्वारगेट ते हडपसर हे मार्ग पायलट प्रोजेक्ट म्हणून निवडले गेले.आता हे सुधारायचं सोडून या मार्गावर उड्डाणपुलाचा घाट घातला जातोय. दुसरीकडे पुण्यातील वाहतूक क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांमधील जाणकार मात्र या भोंगळ कारभारामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडून पडेल असं सांगत असे प्रोजेकट घुसडण्यामागे आर्थिक हितसंबंध दडलेत याकडे लक्ष वेधत आहे.

गेली 6 वर्षे बी. आर. टीचा पायलट प्रोजेक्टही 400 कोटी रूपये खर्चून ही अपयशीच ठरला आहे. बी. आर.टी मार्गावरचे अपघात, सायकलस्वार, पादचार्‍यांकडे दुर्लक्ष, बी.आर.टी मार्गावर इतर वाहनांचं अतिक्रमण या गोष्टींमुळे बी.आर.टी योजना वादग्रस्त ठरली आहे. पण आता लोकप्रतिनिधी उड्डाणपुलाचे समर्थन करत आहे. वाहतूक कोंडी कमी होईल असा दावा करत आहे.

तर नियोजित उड्डाणपुलाचे काम जवळपास 30 महीन चालणार असून 47 कोटी रूपये खर्च याकरता अपेक्षित आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर बी. आर.टी मार्ग बंद राहणार असल्याने तसेच बी. आर. टी मार्ग उखडला जाणार असल्याने आर्थिक नुकसानीसोबत वाहतूक कोंडीही वाढणार आहे. बी. आर. टी, मेट्रोसारखे प्रकल्प पुण्यासारख्या वाढणार्‍या शहराला गरजेचे आहेत पण जर नीट अंमलबजावणी केली नाही, नियोजनपूर्ण कारभ केला नाही तर पुणेकरांच्या वाट्याला मनस्तापच येणार हे नक्की.

close