मुंबईकरांना मोहिनी सुफी संगीताची

November 24, 2008 6:26 AM0 commentsViews: 4

24 नोव्हेंबर, मुंबई भक्ती पेठकर 'अल्ला अल्ला…' ही कव्वाली हॉर्निमल गार्डनमध्ये उपस्थितांना ताल धरायला लावत होती… जेव्हा इजिप्तशियन सुफी संगीत सुरू झालं तेव्हा तर प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत होते. हे चित्र पहायला मिळालं आठव्या ऑल इंडिया सुफी आणि मायस्टिक म्युझिक फेस्टिवलमध्ये. या महोत्सवाचं आयोजन मुंबईतल्या हॉर्निमल गार्डन मध्ये करण्यात आलं होतं. या संगीत महोत्सवात भारतातून तसंच परदेशातूनही आलेल्या कलाकारांनी सुफी संगीताची जादू दाखवून दिली. सुफी संगीताच्या रूहानियतीला म्हणजे कॉन्सर्टला सुरवात झाली केरळच्या कलाकारांच्या परफॉर्मन्सने. तुर्की, अफ्रीकन, इजिप्त यांच्या तोडीसतोड पंजाबी आणि राजस्थानी कलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. मैफिलीत जान आणणारे हे कलाकार सुफी संगीताबद्दल सांगतात – " सुफी संगीत म्हणजे प्युअर डिव्होशनल आहे. यात डेप्थ आहे. यातून एक वेगळाचं आनंद मिळतो." असं तुर्की आर्टिस्ट लतिफ म्हणाले. अध्यत्मातून, बंडखोरीतून, शांततेच्या पुरस्कारातून सुफी संगीताचा जन्म झाला आहे, असं कव्वाली आर्टिस्ट शमीम नयिम अजमेरी यांचं म्हणणं आहे. अशा या अनोख्या सुफी संगीतावर रसिक प्रेक्षकही बेहद्द खूश होते. " आम्हाला त्यातल्या पदांचा अर्थ कळला नाही. पण त्या पदांचा जो नाद होता, त्या पदांना ज्या संगीतामध्ये गुंफलं होतं, त्यानं टवटवीत वाटलं, ताजंतवानं व्हायला झालं, " असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या प्रांतातून, देशातून मुंबईत एकत्र आलेल्या या कलाकारांच्या भाषा भले वेगवेगळ्या होत्या पण त्यांना सांधणारा एकच धागा होता तो म्हणजे सुफी संगीताचा !

close