येडियुरप्पा पुन्हा अडचणीत

April 20, 2012 6:02 PM0 commentsViews: 6

20 एप्रिल

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे बंडखोर नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्नाटकातल्या घोटाळ्यांचा तपास नक्की कसा केला जावा, याबद्दल माहिती घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात कर्नाटकातल्या खाणींचे अनेक परवाने अवैध पद्धतीने वाटले गेले आणि याची सीबीआयकडून चौकशी करावी अशी शिफारस करण्यात आली. त्यामुळे आता येडीयुरप्पा यांची सीबीआय मार्फत चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी कर्नाटकातील लोकायुक्त संतोष हेगडे यांनी येडियुरप्पा यांच्या काळात खनिज उत्खननाचे परवाने नियम डावलून गेलेले आहेत, असा अहवाल दिला होता. त्यानंतर, येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण, लोकायुक्तांचा हा अहवाल बंगळुरू हायकोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे येडीयुरप्पा यांनी पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्री करावं असा दबाव भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर आणला होता. पण, आता विशेष पॅनेलच्या अहवालामुळे येडीयुरप्पा पुन्हा एकदा अडचणीत आलेत. दरम्यान हा निव्वळ अहवाल आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल नाही अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा यांनी दिली.

close