‘बोफोर्स प्रकरणात बिग बींना फसवले, क्वात्रोचीला वाचवले’

April 25, 2012 9:25 AM0 commentsViews: 14

25 एप्रिल

बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा हात नव्हता आणि अमिताभ बच्चन यांना या प्रकरणात विनाकारण फसवण्यात आले होते. तसेच या प्रकरणाबाबत ठोस पुरावे असतानाही राजीव गांधी यांनी क्वात्रोचीला वाचवले. याबाबत तब्बल 25 वर्षानंतर स्वीडनचे माजी पोलीस प्रमुख स्टेन लिंडस्ट्रॉम यांनी हा गौप्यस्फोट केला.

सीबीआयने बोफार्स प्रकरणाची फाईल दोन वर्षापुर्वी बंद केली आहे. दोन वर्षानंतर हा खळबळजनक खुलासा झाला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाच घेतल्याचा कोणताही पुरावा नाही पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती असंही स्टेन लिंडस्ट्रॉम यांनी म्हटलं आहे. पण सरकारने मुख्य आरोपी क्वात्रोचीला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले गेले असल्याचा खुलासाही केला आहे. स्टेन यांनी दावा केला आहे की, मी बोफोर्सचे एमडी मार्टिन अर्दबो यांना जी डायरी पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांना दिली होती. यामध्ये अर्दबो यांनी लिहुन ठेवले होते 'एन' नावाचा व्यक्तीबद्दल माहिती झाली तर त्याबद्दल काही अडचणी होणार नाही पण 'क्यू'च्याबद्दल पत्ता लागता कामा नये कारण तो 'आर' च्या जवळचा आहे. 'एन' म्हणजे अरुण नेहरु आणि 'क्यू' म्हणजे क्वात्रोची आणि आर म्हणजे राजीव गांधी आहे.

स्टेन यांच्या म्हणण्यानुसार क्वात्रोचीच्या विरोधात भारत सरकारकडे संपूर्ण पुरावे होते पण काही अधिकार्‍यांनी याबद्दल भेट घेतली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करणार्‍या चित्रा सुब्रमण्यम यांना दिलेल्या मुलाखतीत राजीव गांधी यांच्याबद्दल उल्लेख केला होता. चित्रा यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला तेव्ही स्टेन यांनी 350 पानाचे दस्तावेज चित्रा यांना दिले होते. तसेच अमिताभ बच्चन यांना या घोटाळ्यात नाव जोडण्यासाठी दबाव टाकला गेला होता असं स्टेन यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांच्याबाबतच्या बातम्या स्वीडनच्या न्यूज पेपरमधून पेरण्यात आल्या होत्या असंही स्टेन यांनी स्पष्ट केलं. आज 25 वर्षानंतर बच्चन परिवांना मोठा दिलासा मिळाला. जया बच्चन यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. तर अमिताभ बच्चन यांनी याबद्दल टिवट्‌रवर आनंद व्यक्त केला. पण त्या काळात अमिताभ बच्चन यांना जे सोसवं लागलं त्याचं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

close