मुंबईचा पंजाबवर 4 विकेट राखून विजय

April 25, 2012 4:53 PM0 commentsViews: 1

25 एप्रिल

आयपीएलमध्ये आज अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 4 विकेट राखून मात केली. आणि सचिन तेंडुलकरला विजयाची भेट दिली. पहिली बॅटिंग करणार्‍या किंग्ज इलेव्हने मुंबईसमोर विजयासाठी 169 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. डेव्हिड हसी आणि डेव्हिड मिलरनं फटकेबाजी करत मुंबईच्या बॉलर्सची धुलाई केली. विजयाचे बलाढ्य टार्गेट समोर ठेऊन खेळणार्‍या मुंबईने सुरुवात चांगली केली. जेम्स फ्रँकलिन आणि सचिन तेंडुलकरने पहिल्या विकेटसाठी 52 रन्सची पार्टनरशिप केली.

पण त्यांना रनरेट मात्र राखता आला नाही. अझर मेहमूदने या दोघांनाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. तर पोलार्ड आणि दिनेश कार्तिकही झटपट आऊट झाले. रोहित शर्मानं हाफसेंच्युरी करत विजयाचा पाया रचला. पण खरी कमाल केली ती अंबाती रायडू आणि रॉबिन पीटरसनने. मुंबईला 2 ओव्हरमध्ये विजयासाठी 32 रन्सची गरज होती. रायडू आणि पीटरसनने पियुष चावलाच्या एकाच ओव्हरमध्ये 27 रन्स करत टीमला शानदार विजय मिळवून दिला.

close