राष्ट्रपतींनी केली पुण्यातील जमीन परत

April 27, 2012 1:43 PM0 commentsViews: 9

27 एप्रिल

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुण्यातली वादग्रस्त 4 एकर जमीन परत केली आहे. मीडियामध्ये आलेल्या उलट-सुलट बातम्यांमुळे व्यथित होऊन आपण ही जमीन परत करतोय, असं राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रसिध्दीपत्रात म्हटलं आहे. निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची पुण्यात राहायला जाण्याची इच्छा आहे. पण त्यांना या घरासाठी दिलेली जमीन नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलीय. असा पुण्यातल्या नागरिकांचा आक्षेप होता. नियमानुसार 2 हजार स्केवअर फूटावर घरं बांधून देण्यात येतं. मात्र, संरक्षण खात्याने नियम डावलून अतिरिक्त जागेवर बांधकाम सुरु केले असा आक्षेप घेत कर्नल सुरेश पाटील यांनी आंदोलन पुकारले होते. सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी राष्ट्रपतींना याबद्दल पत्रही लिहिलं होतं. आयबीएन लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केला. यावर चर्चाही घडवून आणली. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी ही जमीन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे कुठे राहायचं याबद्दल मात्र त्यांनी अजून ठरवलेलं नाही. तर दुसरीकडे राष्ट्रपतींच्या या निर्णयाचे पुणेकरांनी स्वागत केलं आहे.

राष्ट्रपती कार्यालयाचं पत्र

भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मीडियामध्ये आलेल्या बातम्यांंमुळे व्यथित झाल्या आहेत. माजी लष्कर कर्मचारी आणि जवानांच्या विधवांसाठीची जमीन राष्ट्रपतींच्या घरासाठी दिली गेली अशा बातम्यांमुळे राष्ट्रपतींना तीव्र दुख झालं आहे. या जागेबाबत अकारण वाद निर्माण करण्यात आलाय. माध्यमांनीही अशा बातम्या दिल्या त्यामुळं जास्त दुख झालं. जवानांच्या कल्याणासाठी आणि जवानांच्या विधवांंच्या मदतीसाठी राष्ट्रपतींनी पुढाकार घेतला. त्यांच्याबद्दल राष्ट्रपतींच्या मनात आदर आहे. या प्रकरणात माहितीचा विपर्यास करण्यात आला आहे. पण लोकभावनेचा आदर करून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या घरासाठी दिलेली जमीन परत करण्याचा निर्णय घेतला. आता तरी हा वाद थांबेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीय.

close