भारतीय चित्रपटसृष्टीचे खरे जनक कोण ?

May 2, 2012 4:42 PM0 commentsViews: 4

02 मे

भारतीय चित्रपट सृष्टीच्या शताब्दी वर्षातच चित्रपटसृष्टीचा जनक कोण यावरुन आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये चित्रपट काढला तर त्याच्या तब्बल एक वर्ष आधी म्हणजे 1912 मध्येच दादासाहेब तोरणेंनी चित्रपट तयार केला होता. यामुळे चित्रपट सृष्टीचे खरे जनक तेच ठरतात असा दावा तोरणेंचे चिरंजीव विजय तोरणे यांनी केला आहे. दादासाहेब तोरणेंनी 'पुंडलिक' नावाचा चित्रपट काढला होता. पुण्यामध्ये आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. 1912 मध्ये तोरणेंनी फाळकेंच्या आधी एक वर्ष हा चित्रपट तयार केला असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया या मध्ये आलेली जाहिरात सादर केली आहे. यावेळी इंडियन मोशन पिक्चर असोसियशन चे संचालक विकास पाटील उपस्थित होते.

यावेळी दिवंगत अभिनेते चंद्रकांत गोखले यांनी ही तोरणेंना जनक म्हणवले जावं अशी मागणी केली असल्याची बातमी देखिल जोडण्यात आली आहे. या विषयी पंतप्रधानांना पत्र लिहुन तोरणेंची दखल घेतली जावी अशी मागणी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसियशन चे संचालक विकास पाटील यांनी केली आहे. जर येत्या महिनाभरात याविषयीचा निर्णय झाला नाही तर कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पानशेत पुराच्या वेळी तोरणेंकडच्या अनेक वस्तु, फिल्मस वाहुन गेल्या आहेत. त्यामुळे आता याविषयी इतर पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगतानाच लंडनमध्ये संपर्क साधून पुरावे मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. चित्रपट सृष्टीच्या शताब्दी वर्षामध्ये तरी तोरणेंची दखल घेतली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

close