पुण्यात महार वतनाची जमीन लाटली !

May 4, 2012 5:15 PM0 commentsViews: 30

04 मे

पुण्यामध्ये भूखंड लाटण्याचे आणि दडपशाहीचे अनेक प्रकार समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप होतोय आणि तोही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला श्रीनिवास पवार यांच्यावर. रिहे गावातली ही जमीन आहे गावातले गुलाब गजरमल या गावकर्‍याने आज एक पत्रकार परिषद घेतली. हिंजवडी आय. टी पार्कजवळ असलेली ही सुमारे 2 एकर जमीन एका हिस्सेदाराला हाताशी धरून लाटण्यात आली, असा आरोप गजरमल यांनी केला. या हिस्सेदाराला पैशाची लालूच दाखवून आणि जिल्हाधिकार्‍यांच्या मूळ आदेशात खाडाखोड केल्याचंही गरजमल यांचं म्हणणं आहे. माहितीच्या अधिकाराचा वापर करून अनेक जमीन घोटाळे उघड करणारे पुण्यातले वादग्रस्त बिल्डर रवी बर्‍हाटे हेही या पत्रकार परिषदेला हजर होते.

सरकारी दस्तावेजात खाडाखोड करून महार वतनाची जमीन बळकावण्याचा हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे अजित पवार हे आता त्यांच्या नातेवाईकांवर कारवाई करणार का, असा सवाल रवी बर्‍हाटे यांनी केला. रवी बर्‍हाटे यांनी यापूर्वी पुण्यातल्या रामोशी वतन जमिनीचे प्रकरण पुढे आणलं होतं. रवी बर्‍हाटे यांच्याकडे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचं कुलमुखत्यार पत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशना दरम्यान केला होता. आता बर्‍हाटे यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांनाच टार्गेट केल्यानं जमिनीचं हे नवं प्रकरण ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

close