धोणीला काही सूर सापडेना

May 4, 2012 11:46 AM0 commentsViews: 3

राजीव कासले, मुंबई

04 मे

आयपीएलमध्ये सलग दोन जेतेपद पटकावणार्‍या चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामात मात्र अजूनही सूर सापडलेला नाही. टॉप फोरमध्ये येण्यासाठी टीमचा अजूनही संघर्ष सुरु आहे. साहजिकच टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचा करिश्मा कमी झाला आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकला. पण यानंतर धोणीच्या कॅप्टनशीपला जणू ग्रहणच लागलंय. टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय टीम अव्वल स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर घसरली. तर वन डे क्रिकेटमध्येही गेल्या वर्षात टीमला एकाही स्पर्धेत फायनल गाठता आली नाही. आणि आता तर आयपीएलमध्येही धोणीचं नशीब त्याच्यावर रुसलंय. धोणीची चेन्नई सुपर किंग्ज विजयासाठी सध्या झगडताना दिसत आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुणे वॉरिअर्स विरुध्द शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नई सुपरला पराभव पत्करावा लागला. चेन्नई टीम पॉईंटटेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे आणि दहापैकी 5 मॅचमध्ये टीमला पराभव पत्करावा लागला आहे.

आयपीएलच्या गेल्या चार हंगामात चेन्नई टीमने तब्बल तीनवेळा फायनल गाठलीय आणि यातल्या दोनवेळा जेतपदही पटकावलं आहे. पण पाचव्या हंगामात टीमचं प्ले ऑफमधलं स्थानही धोक्यात आहे. साहजिकच धोणीचा करिश्मा कमी झालाय का अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

संगकाराचा धोणीला सल्ला

श्रीलंकेचा विकेटकिपर आणि आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सचा कॅप्टन कुमार संगकारानं धोणीला एक सल्ला दिला आहे. 'कॅप्टन, विकेटकीपर आणि बॅट्समन अशी तिहेरी जबाबदारी धोणीवर आहे आणि याचाच परिणाम त्याच्या कामगिरीवर होतोय. धोणीनं माझ्यासारखं विकेटकीपिंग सोडून केवळ कॅप्टन आणि बॅटिंगवर लक्ष द्यावं.

आता संगकाराचा हा सल्ला धोणी स्विकारणार का हे येणार काळच ठरवेल. पण या कठीण परिस्थितीतूनही धोणी मार्ग काढेल आणि टीमला पुन्हा फायनल गाठून देईल असा विश्वास त्याचे चाहते मात्र बाळगून आहेत.

close