गरिबीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

May 7, 2012 12:25 PM0 commentsViews: 39

कन्हैय्या खंडेलवाल, हिंगोली.

07 मे

केंद्र सरकारने एका दिवसात 32 रुपये जगण्यासाठी पुरेसे आहे असं सांगून गरीबांची थट्टा केली आहे. याच गरिबीचे चटके जगण्यासाठी किती भयानक आहे याची जाणीव करुन देणारी घटना हिंगोलीत घडली आहे. बोराळा गावातील कुंडलिका फटांगळे या शेतमजुराने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी गरिबीला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घरात फक्त 1 एकर माळाची शेती आणि खाणारी 5 माणसं. आर्थिक गरजा भागवण्यासाठी घरातील सगळेच दुस-यांच्या शेतावर मजुरीसाठी जात होते. याच परीस्थितीत त्यांनी 2 मुलींचं लग्नही केलं. पण कर्जाचा वाढता डोंगर आणि खाण्यासाठीही पैसे नाही या परीस्थितीला कंटाळुन अखेर आयुष्य संपवणं हा एकच मार्ग कुंडलिका फटांगळे यांना जवळचा वाटला.

हिंगोली जिल्हा जरी मराठवाड्याचा भाग असला तरी विदर्भाच्या सीमेवर आहे. कोरडवाहु शेती, सिंचनाचं अवघं 4 टक्के क्षेत्र यामुळे शेतीतून या भागात होणारं उत्पन्न अगदीच कमी. 2004 पासून 15 मार्च 2012 पर्यंत 76 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सरकारी आकडे सांगतात.आणि त्यातही फक्त 42 शेतकर्‍यांनाच्या कुटुंबीयांना 1 लाखाची सरकारी मदत मिळाली आहे. चुकीचं सरकारी धोरणही या आत्महत्यांना जबाबदार असल्याचं जाणकार सांगतात.

कुंडलिका फटांगळेनं अनेक चकरा मारुनही त्याला पिवळं कार्ड सुध्दा मिळालं नव्हतं. सरकार गरीबांसाठी अनेक योजना राबवते. पण त्याचा फायदा खरोखर गरीबांना होतो का ? गरीबांचा तारणहार असल्याचा दावा करणा-या सरकारनं दारिद्र्य रेषेखाली असणा-यांना अक्षरश: वा-यावरंच सोडलंय असंच या घटनेवरुन पुन्हा दिसतंय.

close