अण्णांच्या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद

May 9, 2012 5:51 PM0 commentsViews: 3

माधव सावरगावे, औरंगाबाद

09 मे

दिल्ली गाजवल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. जनलोकपाल प्रमाणेच सशक्त जनलोकायुक्त कायद्यासाठी अण्णा महाराष्ट्र दौर्‍यावर निघाले आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरू केलेल्या या दौर्‍यात अण्णांनी अख्खा मराठवाडा पिंजून काढला. अण्णांच्या या दौर्‍यालाही लोकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय.

लोकपालचा लढा दिल्लीत सुरू असतानाच.. अण्णांनी आता मोर्चा वळवलाय तो महाराष्ट्राकडे. राज्यातला लोकायुक्त कायदा कमकुवत असल्यामुळे भ्रष्टाचार फोफावतोय. त्यामुळे सशक्त असा जन लोकायुक्त कायदा आणा, ही मागणी करत अण्णा राज्यभर फिरतायत. गेल्या आठ दिवसात..त्यांनी अख्या मराठवाड्यात जनजागृतीची राळ उडवली.

शिर्डीहून सुरू झालेल्या दौर्‍यात अण्णांनी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोल सभा घेतल्या. 1 मेला शिर्डीत झालेल्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पण मराठवाड्यातली पहिलीच सभा औरंगाबादमध्ये झाली. तिथे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अण्णांच्या या आंदोलनाविषयी साशंकता निर्माण झाली होती. पण त्यानंतरच्या सगळ्या सभांना सर्वच स्तरातल्या जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः लातूर आणि उस्मानाबादमध्ये लोकांनी या भ्रष्टाचार विरोधी यात्रेला जोरदार प्रतिसाद दिला. लोकायुक्त कायद्याची माहिती देणार्‍या 20 हजार पुस्तकांची विक्री झाली.

मराठवाड्यानंतर, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अण्णांची ही यात्रा जाणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत यात्रेचा समारोप होईल. पण अण्णांच्या या जनजागृती यात्रेमुळे राज्य सरकार सशक्त लोकायुक्त कायदा आणण्यासाठी खरंच दबाव निर्माण होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

close