राजकीय व्यंगचित्रांची सर्वच पुस्तकं मागे घेणार

May 14, 2012 8:51 AM0 commentsViews: 3

14 मे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्राचा वाद आज पुन्हा लोकसभेत गाजला. दबावानंतर अखेर सरकारने सर्वच पुस्तकांतली राजकीय व्यंगचित्रं वगळण्याची आणि पुस्तकं मागे घेण्याची घोषणा केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. पण विरोधकांनी मात्र कपिल सिब्बल यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत संसद दणाणून सोडली.

राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एनसीईआरटी (NCERT) च्या अभ्यासक्रमातल्या या व्यंगचित्रावरुन विरोधकांनी मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. सत्ताधार्‍यांच्या स्पष्टीकरणाचाही उपयोग झाला नाही.

या वादग्रस्त व्यंगचित्राबाबत एनसीईआरटीकडून स्पष्टीकरण मागण्यात आलंय. व्यंगचित्र पुस्तकांतून काढण्याचे आदेशही देण्यात आले आहे. इतकंच नाही तर यापुढे राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त व्यंगचित्रांचा अभ्यासक्रमात समावेश न करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पण, लोकसभेतला गोंधळ कमी झाला नाही.

संसदेच्या 60 वर्षानिमित्त झालेल्या विशेष चर्चासत्रात जवळपास सर्वस मोठ्या नेत्यांनी संसदेत वाढलेल्या गदारोळाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याला एक दिवसही झाला नाही आणि लोकसभेत पुन्हा तोच गोंधळ दिसला.

दबावाला बळी पडून सरकारने व्यंगचित्र काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेतच व्हावी, यापेक्षा मोठं दुदैर्व ते काय..

close