आता बोगस ग्रंथालयांची शोध मोहिम

May 14, 2012 5:31 PM0 commentsViews: 6

14 मे

बोगस विद्यार्थी, शाळांच्या गैरकारभार उघड होण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या पट-पडताळणी मोहिमेच्या धर्तीवर आता बोगस ग्रंथालयांची शोध मोहिम राबवली जाणार आहे.याच महिन्याच्या 21 ते 25 मेच्या दरम्यान राज्यभरातील सर्व शाळा,महाविद्यालयाची तपासणी केली जाणार आहे. आज राज्य सरकारने एक परिपत्रक काढून याची घोषणा केली आहे. यामुळे बोगस अनुदान लाटणारी वाचनालये बंद होणार आहेत.

बोगस विद्यार्थी शोधण्यासाठी मोठा गाजावाजा करत सरकारने सर्व जिल्हा परिषद शाळेत पट-पडताळणी मोहिम राबवली होती. या मोहिमेत अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले होते. अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी बसवण्यात आले होते तर कुठे खोट्या शाळाच भरवण्यात आल्या होत्या. या प्रकरणात दोषी आढळलेल्या शाळांवर थेट फौजदारी कारवाई करण्याच निर्णय सरकारने घेतला. पण ऐन कारवाईच्या दिवशी औरंगाबाद खंडपीठाने या कारवाई अंतरिम स्थगिती आणली. आता राज्यातील बोगस ग्रंथालयाच्या शोधात सरकारने मोहिम उघडली आहे. मुळात पुस्तकांचे मंदिर असलेल्या ग्रंथालयात अशीच 'शाळा' भरली आहे का ? हे या मोहिमेतून लवकरच स्पष्ट होईल.

close