टू जी प्रकरणी ए.राजांना जामीन

May 15, 2012 9:12 AM0 commentsViews: 5

15 मे

बहुचर्चित टू जी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना अखेर 15 महिन्यानंतर 20 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. ए. राजा हे गेल्या 15 महिन्यांपासून दिल्लीतल्या तिहार तुरुंगात होते. पटियाला हाऊस कोर्टाने आपला निर्णय तीन दिवसांपूर्वी राखून ठेवला होता. आज कोर्टाने ए राजा यांनी काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. यामध्ये तपास पथकांना सहकार्य करणे, पुराव्यांसोबत छेडछाड करु नये या अटींवर ए राजांना जामीन देण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी राजा वगळता इतर सर्वांना जामीन मिळाला होता. आता या घोटाळ्यातील सर्व आरोपी जामिनावर बाहेर पडले आहेत.

तब्बल 1 लाख 76 हजार कोटींच्या टेलीकॉम घोटाळ्याप्रकरणी ए राजा यांना मुख्य आरोपी करत अटक करण्यात आली होती. राजांवर टू जी स्पेक्ट्रमचे लायसन्स वाटपात घोळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राजांना 2 फेब्रुवारी 2011 ला अटक करण्यात आली होती. या अगोदर दोनवेळा त्यांची कसून चौकशी झाली होती. 2 जी प्रकरणात एकूण 17 आरोपी आहे यामध्ये तीन कंपन्यांचाही सहभाग आहे. ए राजांचे वकील म्हणतात, या प्रकणात 14 पैकी 13 जणांना जामीन मिळाला आहे त्यामुळे ए राजा यांनी तुरुंगात राहण्याचा काही अर्थ बनत नाही. राजा यांनी 13 वे आरोपी सिध्दार्थ बेहुरा यांना जामीन मिळाल्यानंतर जामीन अर्ज दाखल केला. आज संध्याकाळपर्यंत राजांची तुरुंगातून सुटका होईल. राजा यांना जामीन मिळाल्यामुळे डीएमकेचे नेते टी आर बालू यांनी आनंद व्यक्त केला. राजांच्या समर्थकांनी पेढे वाटून एकच जल्लोष केला. राजांना जामीन मिळाला असला तरी त्यांना लवकरच शिक्षा होईल, असं हा घोटाळा बाहेर काढणारे जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांना वाटतंय. तर हा खटला कमजोर करण्याचा प्रयत्न असल्याचं अण्णाद्रमुकला वाटतंय. राजांना जामीन मिळाला असला तरी सुनावणीसाठी त्यांना कोर्टात हजर रहावंच लागणार आहे.

ए. राजांना सशर्त जामीन

- 20 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन- पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागेल- दूरसंचार कार्यालय किंवा तामिळनाडूला जाता येणार नाही

2 जी घोटाळ्याच्या घटनाक्रमावर

मे 2007 : ए. राजा यांनी दूरसंचार मंत्री म्हणून शपथ घेतलीजाने.2008 : दूरसंचार मंत्रालयानं 2जी परवाने वितरीत केलेमे 2009 : व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची टेलिकॉम वॉचडॉग नावाच्या एनजीओ (NGO)ची सीव्हीसी (CVC)कडे तक्रारऑक्टो.2009 : सीबीआयनं 2 जी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केलामार्च 2010 : परवाने वाटपात मोठा गैरप्रकार झाल्याचा कॅगचा ठपकानोव्हे.2010 : राजा यांनी दूरसंचार मंत्रीपदाचा राजीनामा दिलाफेब्रु.2011 : टेलिकॉम अधिकार्‍यांसह ए. राजा यांना अटकमे.2011 : द्रमुक खासदार कनिमोळी यांना अटकनोव्हें.2011 : सुप्रीम कोर्टाकडून कनिमोळींना जामीनफेब्रु.2012 : सुप्रीम कोर्टानं ए. राजांच्या काळात वाटप केलेले 122 टेलिकॉम लायसन्स रद्द केलेमे 2012 : ए. राजा यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला15 मे 2012 : 15 महिने आणि 13 दिवसांनंतर राजांना सशर्त जामीन मंजूर

राजांचा प्रवास खडतरचए. राजा हा केंद्राचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या द्रमुकचा दलित चेहरा आहे. राजांना जामीन मिळाल्यानंतर द्रमुकमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण यापुढे त्याचं पक्षातलं स्थान पहिल्यासारखंच राहिल का, यावर प्रश्नचिन्हं आहे. ए. राजा. हे द्रमुक अध्यक्ष करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांच्या गटातले. म्हणूनच त्यांना केंद्रात दूरसंचार सारखं महत्त्वाचं खातं मिळालं. पण, 2 जी घोटाळ्याचा फटका द्रमुकला बसला. 2011 साली झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पक्षाची सत्ता गेली. त्यामुळेच राजा यांची आज जरी सुटका झाली असली तरी त्यांना पक्षात पूर्वीचंच स्थान द्यायला करूणानिधी यांची दोन्ही मुलं एम. के. स्टॅलिन आणि अळागिरी विरोध करतील, असं म्हटलं जातंय. तिकडे केंद्रातही काँग्रेसमध्ये ए. राजांविषयी फारसं अनुकूल मत नाही. त्यामुळे राजांसाठी पुढचा राजकीय मार्ग खडतरच आहे.

close