मिझोरामच्या निवडणुकीत फक्त 9 महिला उमेदवार

November 24, 2008 5:47 PM0 commentsViews: 9

24 नोव्हेंबर, मिझोराम अरिजीत सेनमिझोराममध्ये 2 डिसेंबरला विधानसभेसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत महिला उमेदवारांचं प्रमाण तसं नगण्य आहे. तिथल्या पुरुषांना महिलांनी निवडणूक लढवलेलीच आवडत नाही. पण यावेळच्या निवडणुकीत महिलाही तितक्याच आत्मविश्वासानं उतरल्यात. हम भी कुछ कम नहीं, हे त्यांना दाखवून द्यायचंय. मतदारयादीत महिलांची संख्या 3 लाख 80 हजार इतकी आहे. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे 205 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत केवळ 9 महिला उमेदवार रिंगणात आहेत. सरकारी ऑफिसमधील 100 अधिकार्‍यांमागे केवळ 40 महिलांचं प्रमाण आहे. निवडणूक काळातही काही वेगळा आकडा आपल्याला पाहायला मिळत नाही, ही दुदैर्वाची बाब. 1984 साली मिझोराम मतदारसंघातून जिंकलेल्या के. थानसियानी यांनी तेव्हाच्या निवडणुकीच्या आठवणी जाग्या केल्या. ' त्यावेळी अनेक पुरुष मतदारांनी मला झिडकारलं होतं. तेव्हा पुरुषांना महिला उमेदवार आवडायच्या नाहीत ', असं माजी आमदार के. थानसियानी यांनी सांगितलं. या निवडणुकीत लालमिंगथांगी हमर या पहिल्याच महिला आहेत की, ज्यांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं. मिझोरामच्या राजकारणात असं पहिल्यांदाच घडलंय. युनायटेड डेमोक्रॅटिक अलायन्सकडून त्या ही निवडणूक लढत आहेत. ' समाजात महिलांचं स्थान फारच दुबळं आहे. पुरुषांविरूद्ध लढण्याची समान ताकद आणि क्षमता महिलांमध्ये नाही. त्यामुळे महिलांना वाटतं, त्या दुबळ्या आहेत, म्हणूनच त्या मागे राहिल्यात ', असं लालमिंगथांगी हमर सांगत होत्या. दोन डिसेंबरला होणार्‍या निवडणुकीत आता महिला खरंच सबलीकरणाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत का, याची प्रचिती मिझोराममध्ये येणार आहे.

close