अण्णांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक

May 16, 2012 1:56 PM0 commentsViews: 1

16 मे

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे जनलोकायुक्तसाठी सद्या राज्यव्यापी दौर्‍यावर आहे. आज संध्याकाळी सातच्या सुमारास नागपूर येथील चिटणीस पार्क येथे अण्णांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला चढवला. ताफ्यातील गाडीवर दगडफेक करून गाडीतील प्रचाराचं साहित्य काढून रस्त्यावर फेकलं. सोनिया गांधी जिंदाबाद अशा घोषणा देणारे हे हल्लेखोर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा आरोप अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केला.

सक्षम लोकायुक्त विधेयकासाठी महाराष्ट्र दिन अर्थात 1 मेपासून महाराष्ट्र दौर्‍यावर निघालेल्या जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आज नागपूरमध्ये दाखल झाले. त्यांची आज नागपूरमधल्या चिटणीस पार्कमध्ये सभा होती. यावेळी प्रचाराचं साहित्य असलेली स्कॉर्पिओ गाडी सभेच्या ठिकाणी पार्क केली होती. एवढ्यात काही लोक आले. त्यांनी सोनिया गांधी जिंदाबाद अशा घोषणा देत गाडीतल्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर गाडीच्या काचा फोडून गाडीतलं प्रचाराचं साहित्य रस्त्यावर फेकून दिलं. त्यानंतर ते निघून गेले.

हे लोक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असं अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांचं म्हणणं आहे. याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी याप्रकरणात अण्णांच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला. अण्णांचे कार्यकर्ते काँग्रेसविरोधी साहित्य वाटत होते. त्यांना अडवण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची आणि दगडफेक झाल्याचं त्यांनी म्हटलंय. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधातलं साहित्य वाटप सुरू असेल तर काँग्रेस ते सहन करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अण्णांच्या गोंदियाच्या सभेदरम्यान, सोनिया गांधींविरोधातल्या पुस्तिकांचं वाटप करण्यात आलं होतं. पण अण्णांच्या सहकार्‍यांनी ही पुस्तकं वाटल्याचा इन्कार केला आहे. या पुस्तक वाटपाशी आमचा काहीही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

close