राष्ट्रपतीपदासाठी संगमांच्या नावामुळे शरद पवार नाराज

May 18, 2012 10:54 AM0 commentsViews: 2

18 मे

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आता राष्ट्रवादीचे नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचंही नाव चर्चेत आहे. पण यावरुन राष्ट्रवादीमध्येच मतभेद असल्याचं दिसतं आहे. राष्ट्रपती पदासाठी संगमा यांनी आपलं नाव पुढे केल्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार नाराज आहेत आणि त्यांनी संगमा यांची कानउघाडणी केल्याची सुत्रांची माहिती आहे. बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुकनं संगमा यांच्या उमेदवारीला कालच पाठिंबा दिला होता. पण संगमा यांना त्यांच्याच पक्षातून पाठिंबा नसल्याचं समजतं आहे.

राष्ट्रपती पदासाठीच्या शर्यतीत आतापर्यंत या प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी यांची नावं चर्चेत सर्वात पुढे होती. आता त्यात राष्ट्रवादीचे नेते पी. ए. संगमा यांचंही नाव चर्चेत आलंय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकणारे दोन पक्ष बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुकनं संगमा यांच्या नावाला पाठिंबा दिला.

दोनच दिवसांपूर्वी संगमा यांनी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललीता यांची भेट घेतली होती. त्यांनीही आता आपले पत्ते आता उघड करत संगमा यांना पाठिंबा दिला.

पण संगमा यांच्यासाठी सर्वात मोठा अडसर हा त्यांचाच पक्ष आहे. नवा राष्ट्रपती हा आदिवासी समाजाचा असायला हवा, हे संगमा यांचं वैयक्तिक मत असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. भाजपने सावध पवित्रा घेत सध्यातरी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

काँग्रेसने अजूनतरी उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. पण संगमा यांना दोन महत्त्वाच्या पक्षांनी पाठिंबा दिलाय. पण काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्यावरही हा पाठिंबा कायम राहतो का, यावर राष्ट्रपतीपदाची निवडणूक अवलंबून आहे.

close