राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत संगमा यांचं नाव चर्चेत

May 17, 2012 5:51 PM0 commentsViews: 9

17 मे

राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आत्तापर्यंत खालच्या स्थानावर असलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. ए. संगमा यांचं नाव आज अचानक चर्चेत आलं आहे. बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक आणि अण्णा द्रमुकने पी. ए. संगमा यांच्या नावाला पाठिंबा देत असल्याचं आज जाहीर केलं. पटनाईक यांनी नुकतीच जयललीता यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी ही घोषणा केली. पी. ए. संगमा यांनी लोकसभेचं सभापतीपदही भूषवलं होतं. नवा राष्ट्रपती हा आदिवासी समाजातला असावा, अशी मागणी संगमा यांनी केली होती. तसं पत्र त्यांनी सर्वच पक्षांना पाठवलं होतं. आज बीजेडी आणि अण्णाद्रमुकनं त्यांना पाठिंबा दिलाय. पण काँग्रेसकडून अजून यावर कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रपती पदासाठीच्या शर्यतीत आतापर्यंत या प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी यांची नावं चर्चेत सर्वात पुढे होती. आता त्यात राष्ट्रवादीचे नेते पी. ए. संगमा यांचंही नाव चर्चेत आलंय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकणारे दोन पक्ष बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुकनं संगमा यांच्या नावाला पाठिंबा दिला.

दोनच दिवसांपूर्वी संगमा यांनी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललीता यांची भेट घेतली होती. त्यांनीही आता आपले पत्ते आता उघड करत संगमा यांना पाठिंबा दिला.

पण संगमा यांच्यासाठी सर्वात मोठा अडसर हा त्यांचाच पक्ष आहे. नवा राष्ट्रपती हा आदिवासी समाजाचा असायला हवा, हे संगमा यांचं वैयक्तिक मत असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. भाजपने सावध पवित्रा घेत सध्यातरी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

काँग्रेसने अजूनतरी उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. पण संगमा यांना दोन महत्त्वाच्या पक्षांनी पाठिंबा दिलाय. पण काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्यावरही हा पाठिंबा कायम राहतो का, यावर राष्ट्रपतीपदाची निवडणूक अवलंबून आहे.

close