फेसबुकवरुन पाठवले होते रेव्ह पार्टीचे निमंत्रण

May 21, 2012 7:21 AM0 commentsViews: 33

21 मे

मुंबईतल्या जुहु येथील हॉटेल ओकवूडवर पोलिसांनी काल रात्री एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणी रेव्ह पार्टीचा आयोजक विषय हांडाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा आणखी एक खुलासा समोर आला आहे. या पार्टीसाठी निमंत्रण हे फेसबुकच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. डिझाइनर हिप्पीस् या या पेजवरुन पार्टीचं निमंत्रण पाठवण्यात आल्याच समोर आलं आहे. या पार्टीची पहिली माहिती ही फेसबुकवरुन 13 मे रोजी देण्यात आली. आणि 19 मे शनिवारी ही पार्टी कुठे आणि कधी होणार आहे हे सांगण्यात आलं. या नंतर जुहु येथील ओकवूड हॉटेलमध्ये पार्टी होणार हे ठरले. याचा वेळ संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यात आला होता. फेसबुकवरुन याची माहिती देत असताना सांकेतिक भाषेत पार्टीत ड्रग्ज असणार आहे हे पण सांगण्यात आलं होते. आयोजक विषय हांडाने एकूण 2533 लोकांना फेसबुकवरुन या निमंत्रण पाठवले होते. पार्टीबद्दल सगळी माहिती देण्यात आली तसेच सुर्यप्रकाश नावाच्या व्यक्तीचा फोन नंबर ही दिला होता.

मात्र अखेर या रेव्ह पार्टीची कुणकुण पोलिसांनी लागली आणि रविवारी रात्री पश्चिम मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल ओकवूडवर छापा टाकण्यात आला. या पार्टीत पोलिसांनी 25 परदेशी नागरिकांसह 128 जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पुणे वॉरियर्सचा खेळाडू स्पिनर बॉलर राहुल शर्मा आणि वेन पारनेल (दक्षिण आफ्रिका) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र त्यांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं. या पार्टीमध्ये कोकेन, चरस, नशेच्या गोळ्यांचा वापर केला गेला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व नशाबाज मुला-मुलींचे युरीन सॅम्पल आणि ब्लड सॅम्पल घेण्यात आले असून त्यांनी लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पार्टीचे आयोजन फेसबुकच्या माध्यमातून केल्याचे समोर आले आहे.

close