नशिबाची धोणीला पुन्हा एकदा साथ

May 21, 2012 9:34 AM0 commentsViews: 6

राजीव कासले, मुंबई

21 मे

आयपीएलच्या पाचही हंगामात प्ले ऑफ गाठणारी चेन्नई सुपर किंग्ज ही एकमेव टीम आहे. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीला नशिबाने पुन्हा एकदा साथ दिली आहे. आणि ज्यावेळी धोणीला नशिबाची साथ मिळते त्यावेळी त्याला रोखता येणं कठीण असतं हा आजवरचा इतिहास आहे.

महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकला. पण यानंतर धोणीच्या कॅप्टनशीपला जणु ग्रहणच लागलं. टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय टीम अव्वल स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर घसरली. तर वन डे क्रिकेटमध्येही गेल्या वर्षात टीमला एकाही स्पर्धेत फायनल गाठता आली नाही.

आयपीएलमध्येही धोणीची चेन्नई सुपर किंग्ज लीगमध्येच बाहेर पडणार असंच वाटत होतं. पण कॅप्टन धोणीला नशिबाने पुन्हा एकदा हात दिला. सरस रनरेटच्या आधारावर धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

16 पैकी आठ मॅचमध्ये विजय मिळवत चेन्नईनं चौथा क्रमांक गाठला. टॉप फोरच्या चौथ्या जागेसाठी बंगलोर-डेक्कनदरम्यानच्या मॅचवर चेन्नईचं भवितव्य ठरणार होतं. चेन्नई आणि बंगलोरच्या खात्यात 17 पॉईंट जमा होते. पण डेक्कने बंगलोरला पराभवाचा धक्का दिला आणि चेन्नईने आयपीएलच्या सलग पाचव्या हंगामात प्ले ऑफमध्ये धडक मारली.

आयपीएलच्या गेल्या चार हंगामात चेन्नई टीमने तब्बल तीनवेळा फायनल गाठलीय आणि यातल्या दोनवेळा जेतपदही पटकावलं आहे. कठीण परिस्थितीतूनही टीमला विजयी मार्गावर आणणारा कॅप्टन असा लौकीक असलेल्या धोणीचं नशीब पुन्हा एकदा रुळावर आलं आहे. आता मिळालेल्या संधीचं सोनं करत आयपीएलमध्ये विजतेपदाची हॅटट्रीक करण्यासाठी धोणीची टीम सज्ज झाली आहे.

close