मोदींचा हट्टा पुढे, संजय जोशींचा पत्ता कट

May 24, 2012 5:54 PM0 commentsViews: 4

24 मेभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी मोठं नाट्य पाहायला मिळालं. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बैठकीला हजर राहणार की नाही, याची मोठी चर्चा होती. मोदी हजर राहिले. पण त्यासाठी मोदींचे विरोधक आणि गडकरींचे सहकारी संजय जोशी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढावं लागलं.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अखेर उपस्थिती लावली. पण मोदींची कट्टर विरोधक समजले जाणारे संजय जोशी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतून राजीनामा दिल्यानंतरच..

संजय जोशींचा राजीनामा हा मोदींनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता. ते जोपर्यंत राष्ट्रीय कार्यकारिणीत असतील, तोपर्यंत बैठकीला हजर राहणार नाही अशी ठाम भूमिका मोदींनी घेतली. मोदींच्या आग्रहापुढे अखेर पक्षाला झुकावं लागलं. 2005 मध्ये एका वादग्रस्त सेक्स सीडीमुळे संजय जोशी यांना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला होता. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं पक्षात पुनरागमन झालं. पण मोदींच्या हट्टामुळे त्यांना पुन्हा राजीनामा द्यावा लागलाय. मोदींनी आता पक्षात मोठी भूमिका बजावायला हवी, अशी इच्छा मोदींचे समर्थक व्यक्त करत आहे.

व्यक्तीपेक्षा सामुहिक नेतृत्त्वावर भर देणार्‍या पक्षाला मोदींपुढेच झुकावं लागलंय. गुजरात दंग्यांनंतरही मोदींनी राजीनामा द्यावा, अशी अटल बिहारी वाजपेयींची इच्छा होती. पण पक्ष कार्यकारिणीनं मोदींच्या पारड्यात मत टाकलं. तिथेही मोदी वरचढ ठरले होते. एकंदरीत भाजपमध्ये केंद्रीय नेतृत्त्वाचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

close