विदर्भात पडलेला ‘आगीचा गोळा’, ही उल्का !

May 25, 2012 2:00 PM0 commentsViews: 10

25 मे

विदर्भात मंगळवारी 22 मे रोजी अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात भिती निर्माण करणारा आकाशातून वेगाने आलेला आगीचा गोळा ही उल्काच होती हे आता सिध्द झालंय. त्याचे अवशेष नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याच्या काही भागात आढळून आले आहेत. भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली यात सापडलेल्या उल्कांचे वजन 750 ग्रॅम असल्याचं आढळून आलंय. ही उल्काच असल्याचं भूवैज्ञानिकांनी सुध्दा याला दुजोरा दिला आहे.

सूर्यमालेत लहान मोठे लघुग्रह आणि धुमकेतूने त्यांच्या मार्गामध्ये सोडलेला धूळीकणांचा कचरा म्हणजे उल्का. हा कचरा जेव्हा पृथ्वीच्या गुरत्वाकर्षणामुळे खेचला जातो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर घर्षण होऊन आगीच्या गोळ्यासारख्या त्या दिसायला लागतात. याचे उदाहरण म्हणजे रात्रीच्या वेळेस तारा तुटला असे आपण म्हणतो त्या उल्काच असतात. पृथ्वीतलावर आजपर्यंत अनेक वेळा उल्कापात झाला आहे. या उल्कापातातूनच 50 हजार वर्षापुर्वी बुलढाणा जिल्हातील लोणार सरोवर तयार झालेत.

सूर्यमालेत अशा अनेक उल्का आढळून येतात. आकाराने मोठा असलेल्या उल्का जेव्हा पृथ्वीवर पडतात तेव्हा त्यांच्या प्रकाशाचा मोठा झोत दिसतो. त्याही पेक्षा मोठ्या उल्का पृथ्वीवर खेचून जळून खाक होऊन आदळतात. मात्र आकाराने प्रचंड मोठ्या असणार्‍या उल्का पृथ्वीचा मोठ्या प्रमाणावर संहार करु शकतात. या उल्का पडताना याचा वेग प्रती सेकंद 60 ते 70 किलोमिटर इतका असतो. एका दिवसाला जवळपास 4 अब्ज उल्का पृथ्वीवर पडतात पण त्या आकाराने लहान असल्यामुळे त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही. अशाच काही उल्का विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात पडल्यात. आज भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन या उल्का ताब्यात घेतल्या आहे. या उल्कांचे वजन 750 ग्रॅम असल्याचं आढळून आलंय.

close