टीम अण्णांचा 15 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

May 26, 2012 9:44 AM0 commentsViews: 3

26 मे

लोकपाल विधेयकावरुन टीम अण्णांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर आरोपाच्या फैर्‍या झाडल्यात. सध्याच्या सरकारमध्ये असलेल्या 34 मंत्र्यांपैकी तब्बल 15 मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पि.चिदंबरम, शरद पवार, विलासराव देशमुख,सुशीलकुमार शिंदे आदी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप टीम अण्णांनी केला. यासाठी त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्रही लिहीलं आहे. सरकारमधील या 15 भ्रष्ट मंत्र्यांविरोधात चौकशी करण्यासाठी सरकारने विशेष चौकशी समितीची स्थापना करावी अशी मागणी केली आहे. या चौकशी समितीने 3 महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.

मध्यंतरी टीम अण्णांवरही अनेक आरोप केले गेलेत. त्या आरोपांची चौकशीसुद्धा या चौकशी समितीने करावी आणि जर आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला दुप्पट शिक्षा द्या असं आव्हानचं टीम अण्णांनी केलंय. जर आपल्या या मागण्या 24 जुलैपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर 25 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा टीम अण्णांनी दिला आहे. आज टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, किरण बेदी आणि शांती भूषण यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भ्रष्ट मंत्र्यांना आरोप केले.

दरम्यान, नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करण्याचे अधिकारी नाही यासाठी अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचं परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांनी सांगितलं आहे.

close