पाणी प्रश्नी नागरीकांनी केली अभियंत्याला बेदम मारहाण

May 26, 2012 2:57 PM0 commentsViews: 1

26 मे

नांदेडमध्ये पाण्यासाठी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक आज एका अधिकार्‍यांच्या जीवावर बेतला. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही आणि पाणीपुरवठा का होत नाही याचे उत्तर सुद्धा अधिकारी देत नसल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी अक्षरश: एका मनपाच्या पाणीपुरवठा अभियंत्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी नांदेडच्या इतवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून प्यायला पाणी नाही, अधिकारी उत्तर देत नाही याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी नागरिकांनी महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग गाठले. आणि अभियंत्याला घेराव घातला. भांबवलेल्या अभियंत्याने लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण संतापलेल्या नागरिकांनी त्यांनाच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. जवळपास 15 मिनिट चाललेला हा राडा अधिकारी बेशुध्द पडल्यावर थांबला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन अभियंत्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अज्ञात मारेकर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close