‘उंच माझा झोका’ मालिकेचं भवितव्य अधांतरी

May 27, 2012 10:54 AM0 commentsViews: 107

अजय परचुरे, मुंबई

27 मे

मुंबईतल्या गोरेगावची चित्रनगरी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखली जाते. 1977 मध्ये स्थापन झालेल्या या चित्रनगरीत मात्र मराठी निर्मात्यांची गळचेपी होतेय. मालिकेच्या निर्मात्यांना या चित्रनगरीत शुटिंग करण्यासाठी 50 टक्के सवलत मिळते. पण ही सवलतच सरकारनं अचानक रद्द केल्यानं आणि अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्यानं सध्या चित्रनगरीत उंच माझा झोका या केवळ एकाच मालिकेचं शुटिंग सुरु आहे. सरकारच्या या मनमानी धोरणामुळं ही मालिका तरी किती दिवस तग धरेल हा प्रश्न आहे.

'उंच माझा झोका' या मालिकेसाठी 1873 चा काळ साकारण्यासाठी तसंच रमाबाई रानडेची कथा मांडण्यासाठी निर्माते वीरेंद्र प्रधान यांनी चित्रनगरीत हा मोठा सेट साकारला आहे. मालिका तर लोकांना आवडली, परंतु राज्य शासनाला ही मालिका मात्र पचनी पडलेली दिसत नाही. शुटिंग करण्यासाठी मराठी निर्मात्यांना 50 टक्के सवलत सरकार देते, पण अचानक ही सवलत जानेवारी 2012 पासून बंद करुन उंच माझा झोकाच्या निर्मात्याकडून अव्वाच्या सव्वा म्हणजेच साडे 40 लाख रु.आत्ता पर्यंत उकळण्यात आले आहे जे मराठी निर्मात्यांच्या बजेटच्या पलीकडं आहे.वीरेंद्रनं याबाबत चित्रनगरीचे अधिकारी शाम तायडे आणि सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना प्रत्यक्ष भेटून याची माहिती दिली. पण मंत्रालयातही निर्मात्यांच्या पदरात निराशाच पडली. याच चित्रनगरीत हिंदी वा इतर भाषीक मालिकांचे सेट दिमाखात उभे आहेत,त्याचे बजेट सुद्धा जास्त आहे पण आपल्या मुंबईतच एका मराठी निर्मात्याला मात्र आपल्याच राज्य सरकारच्या या उदासीन आणि मनमानी धोरणामुळे कदाचित आपली मालिका बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तसेच ही सवलत रद्द केल्यानं यापुढं या चित्रनगरीत एकाही मराठी मालिकेचं शुटिंग होताना भविष्यात दिसणार नाही.

close