मत द्या, 3 लाख घ्या + परदेशवारी फ्री ?

May 29, 2012 2:14 PM0 commentsViews: 21

29 मे

राज्यसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले जातात, हे उघड गुपित आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत पैशाची मोठी उलाढाल झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगपती उमेदवारांनी मतासाठी पाण्यासारखा पैसा वाहिला आहे. एक -एका मतासाठी तीन लाख रुपये देण्यात आले हा प्रकार इथेच थांबला नाही तर मतदारांना बँकाक, पट्टाया,नेपाळ, फाईव्ह स्टार हॉटेलची सफर असं पॅकेजच दिलं. तसेच एका खासदारांना मर्जीत राहण्यासाठी 26 लाखांची एक-एक फोर्डची फॉर्च्युन गाडी भेट दिली. विधानपरिषदेसाठी सहा जागांसाठी निवडणूक झाली पण यासाठी कोट्यावधींची उलाढाल झाली आहे.

अमरावतीत पोटेंनी वाटले 12 कोटी रुपये ?

अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे विजयी झाले आहे. प्रवीण मोटे हे शहरातील प्रसिध्द बिल्डरांपैकी एक आहे. या निवडणुकीत मोटेंना 194 मत मिळाली तर युतीच्या उमेदवाराला फक्त 89 मत मिळाली. आपल्याला मत मिळावे यासाठी एका मताचा भाव अडीच ते तीन लाख रुपये असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासाठी प्रवीण पोटेंनी 10 ते 12 कोटी रुपये खर्च केले असल्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी विखे पाटील यांनी 8 कोटी रुपये खर्च केल्याचा अडसुळ यांचा आरो़प आहे.

मत द्या, बँकाकला फिरायला जा !

चंद्रपूरमध्ये भाजपच्या तिकीटावर बडे कंत्राटदार मितेश भांगडिया विजयी झाले आहेत. भांगडिया यांना आघाडीची 340 मते मिळाली मात्र काँग्रेसच्या पुगलियांना 203 मते मिळाली. भांगडिया यांनी प्रत्येक मतासाठी 3 ते 5 लाख रुपये वाटले असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे मतदारांना बँकाक, नेपाळच्या फाईव्ह स्टार हॉटेलची सफर असं पॅकेजच दिलं. हा प्रकार इथंच थांबत नाही भांगडिया यांनी एका खासदाराला आणि एका अपक्ष आमदाराला 26 लाख रुपये किमंतीच्या एक-एक फोर्डची फॉर्च्युन गाडी भेट दिली आहे.

खुराणांनी उडवले 3 कोटी रुपये ?

परभणीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजानी दुरानी विजयी झाले आहेत. दुरानी हे सुप्रसिध्द खुराणा ट्रॅव्हल्सचे आणि अपक्ष उमेदवार ब्रिजलाल खुराणा यांनी जोरदार लढत दिली. आघाडीकडे 278 मते, पण राष्ट्रवादीच्या दुरानींना फक्त 228 मते मिळाली. यासाठी त्यांनी काँग्रेसची 50 मते फोडली तसेच एका मताची किंमत होती एक लाख रुपये. तर संपूर्ण मतदारसंघात खुराणांनी पूर्ण मतदारसंघात तीन कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बाबाजानी यांना आपल्याचं मतदारांसाठी दीड कोटी रुपये खर्च करावे लागले.

close