सदगुरू वामनराव पै यांचं निधन

May 29, 2012 4:50 PM0 commentsViews: 78

29 मे

जीवन विद्येचे शिल्पकार आध्यात्मिक गुरु वामनराव पै यांचं मुंबईत वृध्दापकाळनं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी गेली ५४ वर्षे सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून व नाम संप्रदाय मंडळातर्फे प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादी द्वारा समाज प्रबोधनाचे कार्य केले.

सदगुरू वामनराव पै हे दादर व इतर मध्यमवर्गीय विभागात प्रवचने करीत असत तेव्हा त्यांना हा संकल्प स्फ़ुरला की, कामगार विभागात कार्य करावे. कामगार विभागातील तळमळीचे व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते सहदेवराव कदम यांनी सदगुरूंची प्रवचने आयोजित करण्यात पुढाकार घेतला व त्यांना वसंतराव मुळे आणि भास्करराव यादव यांनी सुरेख साथ दिली.

या सर्वांच्या सहकार्याने चिंचपोकळी येथील कामगार वेल्फ़ेअर सेंटर येथे सदगुरूंची प्रवचने सुरू झाली. परंतु ते सेंटर नंतर बंद झाल्यामुळे काळाचौकी येथील हनुमान मंदिरात नियमितपणे प्रवचने करण्यास सुरूवात झाली. त्याचवेळी नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन) स्थापनेचा संकल्प सदगुरूंना स्फ़ुरला व तो संकल्प विजयादशमी च्या मुहुर्तावर १९५५ साली साकार झाला. त्या दिवशी सदगुरूंनी जीवनविद्येचा ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केला.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दिवस आणि रात्र एक सारखाच. मुंबईसोबत धावणार मुंबईकरांसाठी अनेक ठिकाणी निवासी,अनिवासी शिबिरे आयोजित करुन अनेक पीडितांना,कामगारांना,उद्योजकांना 'तूच तुझ्या जिवनाचा शिल्पकार' हे समजावून सांगत वामनराव पै यांनी आत्मविश्वास मिळवून दिला. त्यामुळे अनेकांचे संसार सुरळीत झाले. उद्योगपती असो, राजकारणी असो किंवा सर्वसामान्य असो त्याला माणूस बनवण्यासाठी व त्याच्या जीवनात अर्थ आणण्यासाठी अथक प्रयत्न करुन शांतीचा आणि उत्कर्षाचा संदेश दिला. वामनराव पै यांनी हे कार्य गेली 55 वर्ष करत होती. वामनराव पै हे मंत्रालयात फायनान्स विभागात उपसचिव होते. नोकरी सोडल्यानंतर पै यांनी आध्यात्माचे कार्य हाती घेतले ते त्यांच्या 89 व्या वर्षातही सुरु होते.

1952 पासून आध्यात्मिक परिवर्तनासाठी विज्ञानावर आधारित ज्ञानार्जन करण्यास सुरुवात करुन पै यांनी आपली वेगळी ओळख आणि समाजात वेगळा वर्ग निर्माण केला. गेली कित्येक वर्ष कोणतीही अपेक्षा न बाळगता लोकांमधील अज्ञान,अंधश्रध्दा,त्यांच्यमधील निराशवाद, नष्ट करुन त्या सर्वांना सुख,शांती,समाधान,सुयश प्राप्त व्हावी यासाठी अखंड कार्य करीत राहिले. त्यांचे लाखो अनुयायी देशात तसेच विदेशात आहेत. त्यांच्या या अनमोल कार्याला त्यांच्या सहचारिणी सौ. शारदामाई त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हातभार लावला. जीवनविद्या मिशनमध्ये अनेकांनी आपल्या आयुष्याला नवी सुरुवात केली. अनेकांना यशस्वी आयुष्याचा मार्ग मिळाला पण आज लाखो लोकांना आयुष्याचा यशस्वी मार्ग दाखवणारे सदगुरु वामनराव पै यांनी आज जगाचा निरोप घेतला.

close