भाजपमध्ये सुंदोपसुंदी ;अडवाणींची गडकरींवर टीका

May 31, 2012 4:18 PM0 commentsViews: 1

31 मे

पेट्रोल दरवाढीविरोधात आज भाजपने भारत बंद पुकारला. पण आजच्याच दिवशी भाजपमधली सुंदोपसुंदीही उघड झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून अप्रत्यक्षपणे पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वावर टीका केली. त्यामुळे नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपमध्ये असलेले मतभेद किती टोकाचे आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपच्या रॅलीत नितीन गडकरी, नरेंद्र मोदी आणि अरूण जेटली हेच स्टार नेते होते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या सभेकडे पाठ फिरवली. भाजपमधल्या या बदलत्या सत्तासमीकरणाचं प्रतिबिंब अडवाणी यांच्या विकली ब्लॉगमध्येही दिसलं. त्यांनी संघामुळे दुसर्‍यांदा पक्षाध्यक्षपद लाभलेल्या नितीन गडकरी यांच्यावरच ब्लॉगमधून अप्रत्यक्ष टीका केली.

अडवाणींचा ब्लॉग'सध्या भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी मायावतींनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हकालपट्टी केलेल्या कुशवाह यांचा भाजप प्रवेश, झारखंड आणि कर्नाटकमधल्या परिस्थितीची हाताळणी, या सर्वांमुळे पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेची तीव्रता कमी झाली. पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली.'

भाजपमधल्या नेतृत्त्वाचा जुना वाद सोडवण्याचा प्रयत्न मुंबईत झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीतही झाला. अडवाणी आणि पक्षातल्या एका गटाचा विरोध असतानाही संघाच्या पाठिंब्यामुळे गडकरींना दुसर्‍यांदा पक्षाध्यक्षपद मिळालं. तर मोदी आणि गडकरींमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध संपवण्यासाठी संजय जोशींना कार्यकारिणीचा राजीनामा द्यायला भाग पाडलं.

संघाचा पाठिंबा असलेल्या भाजपने पुढच्या पिढीसाठी काही ब्लू प्रिंट तयार केली असेल तर यात अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचं स्थान काय, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आपल्या ब्लॉगमध्ये 97 वर्षांचे अभिनेते ए. के. हंगल यांची स्तुती करून अडवाणींनी स्वत:चंच महत्त्व अधोरेखीत केलंय, असाही एक सूर आहे.

close