एनडीएचा ‘भारत बंद’

May 30, 2012 5:33 PM0 commentsViews: 1

30 मे

केंद्र सरकारनं केलेल्या पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएनं उद्या भारत बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रातही हा बंद यशस्वी करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षानंही कंबर कसली आहे. याची पहिली सुरुवात आज संध्याकाळी नागपुरपासून सुरुवात झाली. शहरातल्या गजबजलेल्या बैद्यनाथ चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाच एसटी बसेसवर तुफान दगडफेक करून तिथून फरार झाले. तर राजधानी मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. मुंबई विद्यापीठाने पालक, विद्यार्थी आणि सर्व परीक्षा केंद्रांना याबाबतच्या सूचना पाठवल्या आहे. इंजिनिअरिंगच्या पहिल्या आणि तिसर्‍या वर्षाच्या परीक्षेचे पेपर उद्या होणार आहेत. बंद शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी राज्यभरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. तर, बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कुणावरही सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.

उद्याच्या या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवला जाईल असा इशारा युतीने दिला. शिवसेना स्टाईलने बंद पाळण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. तर भाजपनंही प्रत्येक शहराची जबाबदारी नेत्यांना वाटून दिली आहे. दरम्यान, उद्याच्या भारत बंदमध्ये कामगार नेते शरद राव यांच्या कामगार संघटना सहभागी होणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या संघटनेच्या ऑटो-रिक्षा, टॅक्सी या सेवा सुरू राहतील. लोकांच्या भावनांचं भांडवल करुन काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देणार नाही, असं शरद राव यांनी स्पष्ट केलंय. मुंबईतल्या डबेवाल्यांनी मात्र बंदला पाठिंबा दिलाय.दरम्यान, अण्णा हजारेंनी एनडीएच्या बंदला पाठिंबा दिला आहे. पेट्रोलचे दर साडे सात टक्क्यांनी वाढवून सरकारनं महागाईच्या आगीत आणखी तेल ओतल्याचं अण्णांनी म्हटलंय. त्यामुळे उद्याच्या बंदमध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हा, असं आवाहन अण्णांनी केलं आहे.

close