मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये राडा

June 1, 2012 10:45 AM0 commentsViews: 29

01 जून 2012

मुंबईतील सीएसटी परिसरातील सिध्दार्थ कॉलेजबाहेर आज दुपारी 2 च्या सुमाराला भारिपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत धुमश्चक्री उडाली. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यात कार्यकर्त्यांची डोकी फुटली, हात पाय फ्रक्चर झाली. याप्रकरणी न्यायालयात प्रकाश आंबेडकर यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी अर्ज दाखल केला आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसमोर.. त्यांच्याच अनुयायांच्या दोन गटातल्या वादामुळे ही हाणामारी झाली. ट्रस्टी म्हणून प्रकाश आंबेडकर हे कॉलेजमध्ये प्रवेश करणार होते. पण आंबेडकरांची नियुक्तीच अयोग्य असल्याचा दावा करत आठवले गटातल्या विश्वस्तांनी प्रकाश आंबेडकरांना रोखलं आणि त्यावरुन हा वाद निर्माण झाला. हायकोर्टाच्या आदेशानुसार एम एस मोरे, डॉ.एस पी गायकवाड यांचीही विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण आज सिद्धार्थ कॉलेजला कुलुप होतं. यावेळी कॉलेजमध्ये प्रवेश करताना पोलिसांनी आंबेडकर यांच्यासह कार्यकर्त्यांना रोखलं. मात्र कार्यकर्त्यांनी प्रवेश करणारच असा पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यात कार्यकर्त्यांची डोकी फुटली, हात पाय फ्रक्चर झाली. आपल्यावर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा कार्यकर्त्यांनी 'पोलीस प्रशासन हाय हाय' असा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. संध्याकाळी सातच्या सुमारास 51 कार्यकर्त्यांना वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. पोलिसांनी अनावश्यक लाठीमार केल्याची तक्रार प्रकाश आंबेडकर यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. याबद्दल न्यायालयान हा अर्ज दाखल करून घेतला आहे.

वाद वर्चस्वाचा- डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वर्चस्वावरून वाद- प्रकाश आंबेडकर गट विरुद्ध रामदास आठवले गट, असा संघर्ष- सोसायटीच्या वर्चस्वावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू- आंबेडकरांना विश्वस्तपदी नेमणूक करण्याचा त्यांच्या सोसायटीतल्या समर्थकांचा प्रयत्न- आंबेडकरांच्या नेमणुकीला आठवले समर्थकांचा विरोध- आठवले समर्थकांच्या सदस्यत्वाला आंबेडकर समर्थकांचं कोर्टात आव्हान

close