सचिनने घेतली खासदारकीची शपथ

June 4, 2012 1:04 PM0 commentsViews: 3

04 जून

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची ओळख आता खासदार सचिन तेंडुलकर म्हणूनही होणार आहे. आज सचिनने खासदारकीची शपथ घेतली. सकाळी 11 वाजता राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्या दालनात शपथ विधी सोहळा पार पडला. यावेळी सचिनची पत्नी अंजली आणि काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला, प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री नारायणस्वामी आणि अन्य नेते उपस्थित होते. सचिनने खासदारकीची शपथ हिंदीतून घेतली.

शपथविधी सोहळ्यानंतर सचिनने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे. पण मी राजकारणी नाही. क्रिकेटमुळे हा सन्मान मला मिळाला आहे त्यामुळे माझं प्राधान्य क्रिकेटलाच राहणार असल्याचं सचिननं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसेच क्रिकेटमुळे मला हा सन्मान मिळाला त्यामुळे क्रिकेटवरचं लक्ष कमी होऊ देणार नाही. खासदार म्हणून फक्त क्रिकेट नव्हे तर सगळ्याचं खेळांबाबत योगदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सचिननं सांगितलं. या अगोदर सुप्रसिध्द अभिनेत्री रेखा यांनी खासदारकीची शपथ घेतली. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सचिन तेंडुलकर, रेखा, महिला उद्योगपती अनु आगा यांना खासदारकीसाठी नामनिर्देशित केले. सचिनच्या खासदारकीचा कार्यकाळ हा 26 एप्रिल 2018 पर्यंत असणार आहे. आपली ओळख केवळ क्रिकेटच्या रेकॉर्ड्सपुरती मर्यादित राहू नये, अशी इच्छाही त्यानं खासदार झाल्यावर व्यक्त केली. क्रिकेटच्या मैदानात जवळपास सर्वच रेकॉर्ड सचिननं आपल्या नावावर केलेत आणि आता राजकारणाच्या मैदानावर सचिन आपली नवी इनिंग सुरु करण्यासाठी सचिन सज्ज झाला आहे.

close