भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा उघड

June 1, 2012 4:21 PM0 commentsViews: 2

मारिया शकील, नवी दिल्ली

01 जून

भाजप पक्षाचं मुखपत्र कमलसंदेशमधून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आज तीव्र टीका करण्यात आली. आणि आजच्याच दिवशी नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची दिल्लीत भेट घेतली. पण लालकृष्ण अडवाणी यांना भेटणं मात्र त्यांनी टाळलं. 2014 च्या निवडणुकांसाठी पक्षानं आपल्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावं, अशी मोदींची इच्छा असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाध्यक्ष नितीन गडकरींवर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. पण पक्षातून त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला जाऊन भाजपचे सर्वोच्च नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पण ते अडवाणींना भेटले नाहीत. यावरून भाजपमधला नेतृत्त्वाचा वाद पुन्हा एकदा अधोरेखीत झाला. पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंग यांनींही अडवाणींच्या मताचं समर्थन केलं नाही. नितीन गडकरींनी तर या मुद्द्यावर मौन राहणंच पसंत केलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षातल्या पुढच्या पिढीसाठी जी ब्लू प्रिंट तयार केलीय त्यात नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि अरूण जेटली यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलंय. सुषमा स्वराज यांनाही यातून वगळण्यात आलंय. यामुळे अडवाणी, जसवंत सिंग सारखे मोठे नेते नाराज आहेत. पण त्याचवेळी नरेंद्र मोदींपुढे नांगी टाकल्याचा संदेश जाऊ नये, असंही संघाला वाटतंय. म्हणूच पक्षाचं मुखपत्र असलेल्या कमल संदेशच्या संपादकीयमधून मोदींवर कठोर शब्दात टीकाही करण्यात आली आहे.

अडवाणींनी गडकरींवर केलेल्या टीकेमुळे भाजपतला अंतर्गत वाद पुन्हा उघड झाला. पक्षात वाढत असलेल्या या असंतोषावर संघ काय उपाय करतो आणि पुढच्या पिढीकडे पक्षाची धुरा देण्यासाठी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची कशी समजूत काढतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

close