रायगडमध्ये तटकरेंचा मालामाल कारभार ?

June 5, 2012 11:10 AM0 commentsViews: 11

अलका धुपकर, रायगड

05 जून

लँड सिलिंग ऍक्टमुळे स्वत:च्या नावावर एका मर्यादेबाहेर जमिनी खरेदी करता येत नाहीत, म्हणून कंपन्या स्थापन करुन सुनील तटकरे जमिनदार बनले, असा जयंत पाटील यांचा आरोप आहे. आपला मुलगा शेतकरी आहे, आणि कंपन्याच्या जमिनीवर तो कृषी उत्पादनं घेतो, असा दावा तटकरे यांनी केला. म्हणून मग आयबीएन लोकमतची टीम पोचली रायगड जिल्ह्यात…या जमिनींवर नेमकं काय सुरुय, याचा शोध घेण्यासाठी…

रायगड जिल्ह्यात आंबा, काजूची शेती ही तशी पारंपारिकच..पण नर्सरी, बागा आणि शेतीला जोडधंदे दाखवून मंत्र्यांचा मुलगा आणि त्यांचे सहकारी कोट्यवधीची उलाढाल दाखवत आहे. तटकरे यांच्याकडे फार्महाऊसवर कामावर असलेला केशव सारंगे यांचा मुलगा किरण सारंगे यांच्या नावावर असणारी दत्तबाग…या दत्तबागेमध्ये सरकारच्याच लघुपाटबंधारे विभागाच्या बंधार्‍यांचं पाणी थेट उचलण्यात आलंय. गीताबाग, गीताबाग नर्सरी ही अनिकेत तटकरे यांच्या नावावर असणार्‍या कंपन्या..याच गीतामृत डेअरी प्रा. लि. ही कंपनी जिथून चालवली जाते त्याच गीताबागच्या गेटवर आम्ही किती जनावरं आतमध्ये आहेत याची चौकशी केली.

गीताबागच्या परीसराच्या अलीकडे आंबिवलीमध्ये दोन्ही बाजूला फुललेय ती अनिकेत तटकरे यांची शेती.. आंबिवली बंधार्‍यांचं पाणी या बागेला मिळतं. काजूच्या नव्यानंचं लावलेल्या कलमांना ठिबक सिंचनापासून सार्‍या सोयी इथं देण्यात आल्या आहेत.

रोहा तालुक्यातून आम्ही गेलो श्रीवर्धनमध्ये…शेखाडी इथं समुद्रकिनारी बाराशे एकरावर तटकरेंच्या प्रकल्पाचं बांधकाम सुरु असल्याची माहिती आम्हाला मिळाली. पण प्रत्यक्षात या जमिनीचे उतारेही तटकरेंच्या सहकार्‍यांच्याच नावाने आहेत. इथं नेमकं कसलं बांधकाम चाललंय हे आम्हाला पाहायचं होतं पण आम्हाला गेटवरच रोखण्यात आलं.

शेखाडी इथं समुद्रकिनारी होऊ घातलेला हा भव्य प्रकल्प नेमका कसला प्रकल्प आहे ? याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जातेय. पालकमंत्री म्हणून सुनील तटकरे यांनी पारदर्शीपणे माहिती दिल्यास संशयाचं हे आणि आरोप प्रत्यारोपांचं हे वादळ शमू शकेल.

close