मोदींच्या दबावामुळे जोशींचा राजीनामा

June 8, 2012 9:37 AM0 commentsViews: 4

08 जून

संघाचे प्रचारक आणि भाजपचे नेते संजय जोशी यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. नरेंद्र मोदींच्या दबावामुळे गेल्या आठवड्यातच जोशींना भाजपच्या कार्यकारिणीतून पायउतार व्हावं लागलं होत. आता त्यांनी पक्षाचाच राजीनामा दिला. त्यामुळे नरेंद्र मोदींचं पक्षातलं आणि विशेषतः राष्ट्रीय पातळीवरचं वजन वाढलंय. पण यामुळे भाजपतली अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

संजय जोशी… भाजपमधलं एक सन्माननीय नाव… पण जोशी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात पूर्वीपासूनच बेबनाव आहे. 2005 साली एका सेक्स सीडीच्या वादामुळे जोशींना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला. पण नितीन गडकरींनीमुळे त्यांचं पक्षात पुन्हा एकदा पुनर्वसन झालं. जोशींचं हे पुनर्वसन मोदींना रुचलं नाही. अखेर त्यांच्या दबावापुढे झुकत जोशींनां आधी भाजप कार्यकारिणीतून बेदखल व्हावं लागलं आणि आता त्यांना पक्षाचाच राजीनामा द्यावा लागला आहे.

संजय जोशी म्हणतात – 'नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रचंड दबाव येत असल्यामुळंच मी हा निर्णय घेतलाय. त्यामुळेच मी पक्षाध्यक्षांकडे उत्तरप्रदेश प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केलीय.'आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोदी किंवा जोशींपैकी एकाची निवड करायला सांगण्यात आलं. त्यामुळे गडकरींकडे दुसरा पर्याय नव्हता आणि त्यांनी जोशींचा राजीनामा स्वीकारला. मुंबईत झालेल्या पक्षाच्या रॅलीत मोदी, गडकरी आणि अरूण जेटली एकत्र दिसले. त्यामुळे पक्षाच्या पुढच्या वाटचालीची धुरा या त्रिकुटाकडे असेल, असा संदेश गेला. पण नेतृत्त्वाचा वाद इथेच संपलेला नव्हता. संजय जोशींच्या राजीनाम्यामुळे 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींकडेच नेतृत्त्व असेल असा सध्या तरी अर्थ काढला जातोय.

जोशींच्या राजीनाम्यामुळे काही प्रश्न ?- संजय जोशींच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावण्याचा नरेंद्र मोदींचा मार्ग मोकळा झालाय का ?- आपणच पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचं भाजप आणि संघाला पटवून देण्यात मोदी यशस्वी झालेत का ?- जोशींच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये आणखी दुफळी माजेल का?

कोण आहेत संजय जोशी?- संजय जोशी मूळचे संघाचे प्रचारक- जोशी मूळचे महाराष्ट्रीय, त्यांनी कामाची सुरुवात लातूरमधून केली- 1988 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला- गुजरातमध्ये त्यांनी पक्ष संघटनेची बांधणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली- सीडी प्रकरणात अडकल्यामुळे बाजूला पडले- गडकरी अध्यक्ष झाल्यावर पक्षाच्या मूळ प्रवाहात परतले- नरेंद्र मोदींचे पक्षातले कडवे विरोधक- साधी राहणी, प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहिले

close