मी देशद्रोही असेन तर मला तुरुंगात टाका -अण्णा

June 12, 2012 1:52 PM0 commentsViews: 5

12 जून

सरकार जर आम्हाला राष्ट्रविरोधी म्हणत असेल तर आमच्यावर कारवाई का करत नाही ? सरकारला जर आम्हाला देशद्रोही म्हणत असेल तर आम्हाला खुशाल तुरूंगात टाकावे असं आव्हान अण्णा हजारे यांनी दिलं. तसेच आमच्यामागे परकीय शक्तीचा हात असल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. पंतप्रधान कार्यालयातूनच आमच्यावर असे आरोप होणे ही गंभीर बाब आहे अशी खंतही अण्णांनी व्यक्त केली. आज मंगळवारी अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दीत पत्रकार परिषद घेऊन सरकारला उत्तर दिले.

टीम अण्णांने पंतप्रधानसह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता याला उत्तर देत अण्णा हजारे देशद्रोही लोकांच्या घोळक्यात अडकले असल्याची टीका पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री नारायण सामी यांनी केली होती. याबाबत पंतप्रधान कार्यालयातून एक पत्रक प्रसिध्द करण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालयातून आपल्यावर करण्यात आलेले टीकेमुळे व्यथित झालेले अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दीत पत्रकार परिषद घेऊन सरकारला सडेतोड उत्तर दिले. वाढती महागाई, भ्रष्टाचार यामुळे जनता वैतागली आहे यासाठी आम्ही जनलोकपाल विधेयकासाठी देशभरात आंदोलन पुकारले. देशवासियांना आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले. हे आंदोलन लोकांच्या संतापाचे उदाहरण होते. मात्र सरकारने याची थट्टा केली. लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. आम्हाच्यावरच देशद्रोहीचा आरोप करण्यात आला. असा आरोप करत आहात तर आम्हाला तुरुंगात टाका असं आव्हान अण्णांनी दिलं. तसेच आमच्या आंदोलनाला विदेशी संस्थांचा हात आहे हा आरोप अंत्यत खोटा आहे. मुळात लोकपाल विधेयकासाठी चालढकल करण्याचा सरकारचा आणखी एक प्रयत्न आहे अशा आरोपही अण्णांनी केला.

close