बीडमधील शासकीय रुग्णालय ‘हाऊस फूल’

June 14, 2012 2:44 PM0 commentsViews: 16

माधव सावरगावे, बीड

14 जून

गर्भपात प्रकरणी बीड जिल्ह्यातील तब्बल 6 डॉक्टरवर गुन्हे दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनही धसका घेतला आहे. कारवाईचा धोका नको, म्हणून खासगी डॉक्टर आता डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलांना ऍडमिटच करुन घेत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डिलिव्हरी वॉर्ड खचाखच भरले आहे.

बीड जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटल… प्रसुतीसाठी आलेल्या महिलांनी हे हॉस्पिटल खचाखच भरलंय. स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारल्यानंतर खासगी डॉक्टरांनी प्रसुतीचे पेशंट घेणं बंद केल्यानं इथं पेशंट्सची एकच गर्दी झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी दिवसाला 15 प्रसुती व्हायच्या ती संख्या वाढून आता 35 झालीय. हॉस्पिटलमध्ये केवळ 2 शिपाई आणि 3 स्टाफ नर्स आहेत. पेशंट्सची वाढलेली संख्या आणि अपुरा स्टाफ यामुळे जवळपास 10 ते 15 महिलांना वेटिंगवर राहावं लागतंय. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर मार्ग काढायचा कसा हाच हॉस्पिटलसमोरचा प्रश्न आहे.

close