डॉ.मुंडे दाम्पत्याला 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी

June 18, 2012 5:08 PM0 commentsViews: 1

माधव सावरगावे, बीड

18 जून

स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय. 26 दिवस देशभर फिरून मुंडे दाम्पत्य पोलिसांना गुंगारा देत होतं. पण सरकारी यंत्रणांसह पोलिसांनी कारवाईचा फास आवळल्यामुळे अखेर त्यांना शरणागती पत्करावी लागली.

गेले 26 दिवस पोलिसांना गुंगारा देत फिरणारा डॉ. सुदाम मुंडे आपल्या पत्नीसह रविवारी पोलिसांना शरण आला. पैसे आणि राजकीय पाठबळाच्या जोरावर कायदे धाब्यावर बसवणारा.. आणि राजरोसपणे बेकायदेशीर गर्भपात करणारा हा नराधम अखेर गजाआड गेला.. त्याला 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

डॉ. सुदाम मुंडेच्या काळ्या कारनाम्यांचा आयबीएन लोकमतनं पर्दाफाश केला. हा मुद्दा मीडियाने लावून धरल्यामुळे सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागली. पण तोपर्यंत डॉ मुंडे दंापत्य फरार झालं होतं. प्रशासनाने डॉ मुंडेच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. डॉ. मुंडेचं हॉस्पिटल सील केलं.मुंडे दाम्पत्याची बँक खाती गोठवली. जमीन व्यवहारांवर बंदी आणली. एवढंच नाही तर त्यांची माहिती देणार्‍याला 40 हजारांचं बक्षीसही जाहीर केलं. ही कारवाई सुरु असतानाच 3 राज्यांमध्ये पोलीस पथकं मुंडेना शोधण्यासाठी रवाना झाली.

पोलिसांना गुंगारा देत डॉ मुंडे दाम्पत्या देशभर फिरत होतं. परळीतून पुण्यात गेले तिथून पिंपरीचिंचवड, पंढरपूर, रायगड, उल्हासनगर, कानपूर, उदयपूर, जयपूर, छत्तीसगड, कर्नाटक पुढे आंध्रप्रदेश आणि शेवटी ते रविवारी परळी पोलिसांना शरण आले. डॉ. मुंडे दाम्पत्याला आज कोर्टात केलं त्यावेळी महिला संघटनांनी निदर्शनं आणि घोषणाबाजी केली. परळीची देशभरात बदनामी करणार्‍या या डॉ मुंडेला कठोर शिक्षा देण्याची त्यांनी मागणी केली.

डॉ. मुंडे दाम्पत्याला अटक झाली असली तरी खरी लढाई आता कोर्टात लढावी लागणार आहे. कारण मुंडेला कडक शिक्षा झाली, तरच त्याच्यासारख्या इतर डॉक्टरांना वचक बसेल.

close