तृणमूल यूपीएतून बाहेर पडणार ?

June 18, 2012 4:28 PM0 commentsViews: 10

18 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन नाराज झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा शस्त्र उगारले आहे. तृणमूलच्या 6 केंद्रीय मंत्र्यांनी ममतांकडे राजीनामा सोपवला आहे. डॉ.एपीजे अब्दुल कलाम हेच राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार आहे असं ठणकावून सांगत यूपीएतून बाहेर पडण्यास तयार असल्याचं तृणमूलचे प्रवक्ते सुदीप बंडोपाध्याय यांनी स्पष्ट केलंय. मात्र आज दुपारीच अब्दुल कलाम यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असून तरीसुध्दा तृणमूलने कलाम यांचे नाव पुढे करत पुन्हा एकदा यूपीए सोडण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशा तशा नाट्यमय घडामोडी घडत आहे. युपीएने 'ममता' झुगारुन प्रणव मुखर्जी यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर केलं. या निर्णयाला विरोध दर्शवत 'ये तो अभी शुरुवात है,खेल अभी बाकी है' असं सांगत ममता आपल्या गावी निघून गेल्यात पण आपण मागे हटणार नाही असंही जाता जाता सांगून गेल्यात. पण सपाने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे ममता एकट्या पडल्यात. पण कलाम यांनाच राष्ट्रपतीपदासाठी योग्य असल्याचा दावा केला. एनडीएनेही कलाम यांनी निवडणूक लढण्यासाठी मनधरणी केली. सुधींद्र कुलकर्णी यांनी आज दोन वेळ त्यांची भेट घेतली. मात्र कलाम यांनी सगळ्यांना आभार मानून राष्ट्रपती भवनाला दूरुनच 'सलाम' केला. या निवडणुकीत मी लढणार नसल्याचं कलाम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे जाहीर करुन टाकलं. कलाम यांनी नकार दिल्यामुळे सगळ्याच चर्चेवर पडदा पडला. पण संध्याकाळी तृणमूलचे प्रवक्ते सुदीप बंडोपाध्याय यांनी आम्ही कलाम यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी विनंती करणार आहोत. कलामच राष्ट्रपतीपदाचे योग्य उमेदवार आहे. यासाठी आम्ही यूपीएतून बाहेर पडण्यास तयार आहोत असा इशारा दिला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तृणमूलच्या सहा केंद्रीय मंत्र्यांनी आपले राजीनामे ममतांकडे सुपूर्द केले आहे. पण बंडोपाध्याय यांनी याचा इन्कार केला आहे. आता खुद्द ममतादीदी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या सहा मंत्र्यांनी सोपवला राजीनामा ?

मुकुलरॉय, रेल्वे मंत्री सुदीप बंडोपाध्याय, आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्रीसुल्तान अहमद पर्यटन राज्यमंत्रीशौगतो रे नगरविकास राज्यमंत्रीसी एम जेथुआ, माहिती प्रसारण राज्यमंत्रीशिशिर अधिकारी ग्रामविकास राज्यमंत्री

close