नितीशकुमारांचे मोदींवर टीकास्त्र

June 20, 2012 11:36 AM0 commentsViews: 1

20 जून

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातला संघर्ष चिघळला आहे. नितीशकुमार यांनी आज पुन्हा एकदा मोदींवर तोफ डागली. 2002 मधल्या गुजरात दंगलींची हाताळणी मोदींनी ज्या पद्धतीनं केली त्यावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नाराज होते असं नितीशकुमार यांनी जाहीरपणे म्हटलं आहे. राजधर्म पाळण्याचा सल्ला मानला नसल्यानं मोदींची उचलबांगडी करण्याची वाजपेयींची इच्छा होती. आणि दंगलींमुळेच 2004 च्या निवडणुकीत एनडीएचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे 2014 सालचे प्रश्न एनडीएला 2012 मध्येच भेडसावत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधातली मोहीम नितीशकुमारनी पुढच्या आणखी तीव्र केलीय. आधी एनडीएच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार धर्मनिरपेक्ष हवा, अशी मागणी करत त्यांनी मोदींवर हल्ला चढवला आणि आता 2004 च्या निवडणुकीत मोदींमुळेच एनडीएचा पराभव झाला असा थेट आरोप केला.

तर भाजपनं नितीशकुमारना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. धर्मनिरपेक्ष कोण हे ठरवण्याचा अधिकार कुणाला दिला नसल्याचं भाजपनं म्हटलंय. संघानंही मोदींच्या मदतीला धाव घेत नितीशकुमारना खडसावलंय. पंतप्रधानपदी हिंदुत्ववादी व्यक्ती का नको? असा सवाल सरसंघचालक मोहन भागवत यांनी विचारलाय. हिंदुत्व हे सर्वसमावेशक असल्याचं संघानं म्हटलंय.

मोदींवरून हा वाद सुरू असताना.. शिवसेना शांत कशी बसणार. मोदींवर नाराज असलेल्या सेनेने भाजपला सल्ला दिलाय की त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार आधीच जाहीर करावा.

मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं, तर सेना आणि नितीश एनडीए सोडण्याची भीती आहे. त्यामुळे आता भाजप संघाचं ऐकणार की मित्रपक्षांचं.. हा सगळ्यांत मोठा पक्ष आहे.

close