सेनेच्या ‘बाणाने’ भाजप घायाळ

June 19, 2012 5:16 PM0 commentsViews: 8

19 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून एनडीएत भाजप एकाकी पडत असल्याचं दिसतंय. एपीजे अब्दुल कलाम यांनी माघार घेतल्यानंतर भाजपनं पी. ए. संगमा यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिलेत. पण मित्रपक्ष शिवसेनेनं यूपीएचे उमेदवार प्रणव मुखजीर्ंना पाठिंबा देत भाजपला धक्का दिला.

यूपीएच्या प्रणव मुखर्जी यांना टक्कर देण्यासाठी भाजपच्या अडवाणींनी उमेदवार उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांच्या या लढ्याच्या इच्छेमुळे भाजप आणि एनडीएवर वारंवार नामुष्कीची वेळ येतेय.

सोमवारी रात्री उशिरा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. आणि पी. ए. संगमांना पाठिंबा देण्याचे संकेत त्यातून मिळाले. पण भाजपच्या या भूमिकेला मित्रपक्ष शिवसेनेकडूनच लगेच सुरूंग लावण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सामनातून प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला. मुखर्जी यांना सर्वच पक्षांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

बाळासाहेब ठाकरे यांचं निवेदन

'सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक बरीच गाजतेय. एवढ्या अवाढव्य अशा देशाचा राष्ट्रपतीपदावरून चाललेला खेळखंडोबा शोभनीय नाही. तलवार म्यानात नसताना उगाच मुठीला हात घालून शौर्यत्व आणि वीरत्व दाखवण्याचा फुका प्रयत्न करू नये आणि कुणीही शिवसेनेवर विश्वासघाताचा, पाठीत खंजीर खपसण्याचा, फुटीरतेचा, दगाबाजीचा आरोप करण्याचं धाडस करू नये. चला, झाले गेले विसरून जा आणि प्रणव मुखजीर्ंना राष्ट्रपतीपदासाठी एकमुखानं पाठिंबा द्या आणि हम सब एक हैं हे जगाला दाखवून द्या.'

शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ शिवसेनाच नाही, संयुक्त जनता दलानंही भाजपला धक्का दिला. आपण प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देऊ शकतो, असे संकेत बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी दिलेत.

भाजप आता एकाकी पडत असल्याचं चित्रं दिसतंय. सुरुवातीला कलाम यांनी भाजपच्या विनंतीला नकार देत राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. भाजपचे मित्रपक्ष शिवसेना, जेडीयू, जेएमएम यांनी प्रणव मुखजीर्ंना उघड पाठिंबा दिलाय आणि शरद पवार आणि यूपीएचा दबाव झुगारून संगमा राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत कायम राहतील का, हा प्रश्न आहे.

या सर्व घडामोडींनतर आता बुधवारच्या एनडीएच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

दरम्यान, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा म्हणजे काँग्रेसला समर्थन नाही, असं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या 46 व्या वधार्पन दिनानिमित्तानं षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

close