शिंदेंनी हात झटकले, विलासरावांवर ढकलले

June 25, 2012 2:27 PM0 commentsViews: 2

25 जून

आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आज न्यायालयीन आयोगासमोर हजर झाले. तब्बल 4 तास त्यांची साक्ष नोंदवण्याच काम सुरु होतं. याप्रकरणी सुशीलकुमारांनी विलासरावांकडे बोट दाखवलं आहे. मी फक्त अधिकार्‍यांकडून आलेल्या नोटींग्ज मंजूर केल्या आहे. आदर्शची जमीन देण्याबाबतचं पत्र मी मुख्यमंत्रीपदाचे सूत्रं घेण्यापूर्वीचं दिलेले होते असा खुलासा शिंदे यांनी केला. सोसायटीला काही नियम धाब्यावर बसवत परवानग्या दिल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आहे.

आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मागील वर्षी प्रतिज्ञापत्रात सोसायटीच्या 51 सदस्यांच्या वाढीव यादीला मंजुरी दिल्याचा आरोप फेटाळला. सदस्यांची पात्रता तपासण्याचे काम जिल्हाधिकारी आणि इतर अधिकार्‍यांचं होतं.त्यांनी छाननी करुन यादी मंजूर करण्याची शिफारस आपल्याला केली. आणि 18 जानेवारी 2003 चं लेटर ऑफ इंटेट हे आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी जारी झालं होतं असं सुशील कुमार शिंदेंनी म्हटलं आहे. याच्याच आधारे पुढची सर्व कार्यवाही झाली.

18 जानेवारी 2003 ला विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला आणि जाता जाता त्यांनी लेटर ऑफ इंटेंट जारी केलं. तसेच सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात कुणीही आदर्श सोसायटीत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आणून दिलं नाही. प्रकाश पेठे मार्गाची रुंदी कमी करणे किंवा आदर्शला वाढीव एफएसआय देणं याच्याशी आपला कुठलाही संबंध नाही ही जमीन राज्य सरकारचीच आहे. असंही सुशील कुमारांनी स्पष्ट केलं आहे.आता विलासराव देशमुख यांची उद्या साक्ष नोंदवली जाणार आहे आता विलासराव काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

close