नागपूरमध्ये रोहयोत कोट्यवधींचा घोटाळा उघड

June 29, 2012 2:00 PM0 commentsViews: 7

29 जून

नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. तब्बल 6 कोटी 42 लाख 97 हजार रुपयांचा हा घोटाळा आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या रोजगार हमी योजनेतले मजुरांचे पैसे अधिकार्‍यांनीच लाटल्याचं उघड झालंय. याबाबत विभागीय आयुक्तांनी तयार केलेला गोपनीय अहवाल आयबीएन-लोकमतच्या हाती लागला आहे. याबाबत सुरुवातीला विभागीय चौकशी करण्यात आली आणि दोषी अधिकार्‍यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर घोटाळ्याला जबाबदार असलेल्या वनविभागाच्या 6 अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं. पण त्यांना अभय मिळत असल्याचा आरोप आहे.

उमरेड तालुक्यात वृक्षारोपण कार्यक्रमासाठी 5 लाख रोपटी तयार करण्यासाठी 3 कोटी 89 लाखांचं अंदाजपत्रक सरकारला सादर करण्यात आलं. पण सगळी 79 अंदाजपत्रकं ही बोगस होती. त्या बोगस अंदाजपत्रकाच्या आधारे अधिकार्‍यांनी 2 कोटी 9 लाख रुपये सरकारकडून लाटले आणि आपापसातच वाटले, असा ठपका विभागीय आयुक्तानी ठेवलाय. विभागीय आयुक्तांचा गोपनीय अहवाल आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. या संदर्भात वन विभागाच्या सहा अधिकार्‍यांचं निलंबन करण्यात आलंय. पण महसूल विभागाच्या अधिकार्‍यांवर फक्त ठपका ठेवलाय. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई केलेली नाही.

कसा झाला घोटाळा

- उमरेड तालुक्यात वृक्षारोपणासाठी 29 प्रकारची 5 लाख रोपटी तयार करण्याचं काम होतं – त्यासाठी 3 कोटी 89 लाखांचं अंदाजपत्रक सरकारला सादर करण्यात आलं- पण त्यात 79 बोगस अंदाजपत्रकांचा समावेश होता – बोगस अंदाजपत्रकांच्या आधारे अधिकार्‍यांनी 2 कोटी 9 लाख रुपये सरकारकडून लाटले – हे पैसे अधिकार्‍यांनी वाटून घेतल्याचा ठपका – मजुरांना मोबदला मिळाला नसल्यानं हा घोटाळा उघड – विभागीय आयुक्तांनी चौकशी केली – त्यात रोपवाटिकेच्या कार्यक्रमात 6 कोटींपेक्षा जास्त घोटाळा झाल्याचं सिद्ध

close