मुंबईत पोलिसांसाठी योगा शिबीर

November 26, 2008 6:28 AM0 commentsViews: 7

26 नोव्हेंबर, मुंबईरोहिणी गोसावीपोलिसांचं आयुष्य म्हणजे दररोजची धावपळ, प्रचंड ताण. त्यात सुट्टी मिळत नाही. त्यामुळे ताण कमी होणार कसा ? पण सध्या मुंबईच्या पोलिसांसाठी योगाचं शिबीर घेण्यात येतंय. पोलिसांचा ताण कमी व्हायला यामुळे मदत होईल.विवेक ठाकूर बोरिवली पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल आहेत. दररोजच्या धावपळीत आणि ताणतणावात त्यांना व्यायाम आणि फिटनेससाठी वेळच मिळत नाही. त्यांच्या इतर सहकार्‍यांची अवस्थाही त्यांच्यासारखीच आहे. म्हणूनच हे योगाचं शिबीर खास पोलिसांसाठीचआयोजित करण्यात आलं आहे. संपूर्ण मुंबईतून जवळपास पाच हजार पोलीस कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. पोलिसांच्या वेळेचं गणित बघून त्यांच्या बॅचेस करण्यात आल्या आहेतसांताक्रुझच्या योगा इन्स्टिट्युटमध्ये हे सात दिवसाचं शिबीर ठेवण्यात आलंय. "आमच्या खात्यात अनेक जणांना ताण तणावामुळं खूप आजार होतात. त्यामुळं हे योगा शिबीर नक्कीच आमच्या साठी खूप उपयोगाचं आहे" असं विकास ठाकूर यांनी सांगितलं."दररोज जवळपास आठ तास आम्हाला गाडी चालवावी लागते. त्यामुळे पाठीचे आजार झलेत, पण योगा केल्यामुळं दोन दिवसातच आराम पडलाय" असं अनिल यांनी सांगितलं.पोलिसांना वीस वीस तास काम करावं लागतं. तासंतास ऊन्हातान्हात उभं रहावं लागतं. त्यामुळं त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हृदयविकारासारखे आजारही त्यांना होतात. "पोलिसांबरोबरच हा योगा सर्वांसाठीच गरजेचा आहे. दररोजच्या आयुष्यातला ताण यामुळं खुपच कमी होतो, आणि कामाचा उत्साह वाढतो" असं योगप्रशिक्षक मिलिंद प्रधान यांनी सांगितलं.रात्रंदिवस काम करणार्‍या पोलिसांना मन:शांतीचीही गरज असते. गेल्या काही वर्षात कामाचा ताण असह्य झाल्याने पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या शिबिरामुळे तणावाचा सामना करण्याची त्यांना शक्ती मिळेल.

close