पदवीधर,शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह

July 2, 2012 9:40 AM0 commentsViews: 5

02 जूलै

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसतोय. आतापर्यंत फक्त 35 टक्के मतदान झालंय.पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या 4 जागांसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि युतीनं आपली पूर्ण ताकदपणाला लावली.

मुंबईत बहुरंगी सामना

मुंबई शिक्षक मतदारसंघात यावेळी बहुरंगी लढत होतेय. या जागेसाठी एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. पण खरी लढत आहे 5 उमेदवारांमध्ये लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील यांची शिवसेना पुरस्कृत भाजप बंडखोर मनीषा कायंदे, काँग्रेसचे बंडखोर बाळासाहेब म्हात्रे, भाजपचे शरद यादव आणि मनसेचे संजय चित्रे यांच्याशी लढत होईल.

कोकणात तिरंगी लढत

कोकण पदवीधर मतदार संघाच्या जागेसाठी तिरंगी लढत आहेत. संजय केळकर, निरंजन डावखरे, निलेश चव्हाण यांनी मतदान केलं.पूर्वी कधीही नव्हती एवढी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगली आहे. गेली 20 वर्ष हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. पण यावेळी भाजपच्या संजय केळकर यांना राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी थेट आव्हान दिलंय. पण राष्ट्रवादीचेच बंडखोर निलेश चव्हाण यांनी ही निवडणूक चुरशीची केलीय. निवडणुकीचा प्रचारही धडाक्यात झाला. होर्डिंगबाजी झाली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये धडक प्रचार केला.

close