कोकणात भाजपला धक्का, निरंजन डावखरे विजयी

July 4, 2012 12:59 PM0 commentsViews: 4

04 जुलै

कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे. निरंजन डावखरे यांचा विजय भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. गेल्या वीस वर्षांपासून कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. पण आता मात्र इथे राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने निरंजन डावखरेंना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होऊन निलेश चव्हाण यांनी बंडखोरी केली आणि त्यांना मनसेनं पाठिंबा दिला होता. याच कारणांमुळे या निवडणुकीत आधी कधीही नव्हती तेवढी चुरस निर्माण झाली होती. निरंजन डावखरे यांनी या निवडणुकीत 5604 मतांनी विजय मिळवलेला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील विजयी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी दुसर्‍यांदा विजय मिऴवला आहे. पाटील यांनी 9,749 मते मिळवत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब म्हात्रे यांचा पराभव केलाय. शिवसेना पुरस्कृत मनिषा कायंदे या तिसर्‍या जागेवर फेकल्या गेल्या असून त्यांना 631 मते मिळाली आहे.

तर पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या डॉ. दिपक सावंत यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला आहे. दिपक सावंत यांना 14,042 मते मिळाली. दुसर्‍या क्रमांकावर अपक्ष उमेदवार राजेश टेके यांना केवळ 1298 मते मिळाली.

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघात टीडीएफ एकीकरण गटाचे अपूर्व हिरे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी गटाचे टीडीएफ गटाचे राजेंद्र लांडे यांचा पराभव केलाय. नाशिक मतदारसंघात पहिल्यांदाच शिक्षक प्रतिनिधीकडून संस्थाचालकाकडे हे पद गेलंय.

close