टेनिसपटू पूर्ण करतील का ‘लंडन ड्रीम’?

July 7, 2012 2:31 PM0 commentsViews: 8

07 जुलै

ऑलिम्पिक इतिहासात टेनिसमध्ये भारताला फक्त 1 मेडल जिंकता आलंय. भारताचा अव्वल टेनिस प्लेअर लिएंडर पेसनं 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिक्समध्ये ब्राँझ मेडलची कमाई केली होती. पण यानंतर असा अभिमानाचा क्षण भारतीय टेनिसनं कधी अनुभवलाच नाही. हा दुष्काळ लंडन ऑलिम्पिकमध्ये दूर होईल का हा प्रश्न भारतीय क्रीडाप्रेमींना सतावतोय. कारण ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय टेनिस टीमला वादाची किनार आहे.

1896 च्या अथेन्स ऑलिम्पिकपासूनच टेनिस हा ऑलिम्पिकचा अविभाज्य खेळ. 1924 च्या ऑलिम्पिकनंतर काही कारणानं टेनिसला वगळण्यात आलं. पण 1988 ला टेनिसला ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा मानाचं स्थान देण्यात आलं. 1988 च्या सोल ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झीशान अलीनं दुसर्‍या फेरीपर्यंत मजल मारली होती.

तर पुरुष डबल्समध्येही विजय आणि आनंद अमृतराज बंधूंनी दुसरी फेरी गाठली होती. पण यानंतर 1992 पासून ऑलिम्पिकमध्ये भारतीय टेनिसची मदार सांभाळलीय ती लिएंडर पेसनं. 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पेसनं ब्राँझ मेडल पटकावण्याची किमया साधली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या पेसनं फर्नांडो मेलिगेनीचा पराभव करत ब्राँझ मेडलवर भारताचं नाव कोरलं. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 44 वर्षांनी भारतानं पटकावलेलं हे दुसरं वैयक्तिक ब्राँझ मेडल ठरलं. गेली वीस वर्ष पेस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय, यंदाचं हे त्याचं सहावं ऑलिम्पिक आहे. पेसनं सिंगलबरोबरच डबल्समध्येही महेश भूपतीच्या साथीनं दमदार कामगिरी केली. 1996 ते 2008 दरम्यान लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीनं हा काळ गाजवला. पण तरीही मेडलनं त्यांना नेहमीच हुलकाणी दिली.

गेली वीस वर्षे या जोडीनs भारताला देदीप्यमान यश मिळवून दिलं असलं तरी या ना त्या कारणावरुन या दोघांमधले मतभेद नेहमीच समोर येत राहिले. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही लिएंडर पेस आणि महेश भूपती खेळतायत पण वेगवेगळ्या जोडीदारांसह… लिएंडर पेस विष्णुवर्धनसह तर महेश भूपती रोहन बोपन्नासह डबल्समध्ये खेळतोय.

पेस आणि भूपतीबरोबरच सोमदेव देवबर्न आणि रोहन बोपन्ना या युवा खेळाडूंकडून भारताला मोठी अपेक्षा आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सोमदेवला सिंगलमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळालीय.

महिलांमध्ये भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा कशी कामगिरी करते याकडेही भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय. चर्चेत राहणार्‍या सानियाला अजून समाधानकाराक कामगिरी करता आलेली नाही. फ्रेंच ओपन स्पर्धेत भूपतीच्या साथीनं तीनं जेतेपद पटकावलं. पण विम्बल्डनमध्ये सानिया-भूपतीला दुसर्‍याच फेरीत पराभव पत्करावा लागला. आता ऑलिम्पिकमध्ये सानिया लिएंडर पेससह मिक्स डबल्समध्ये सहभागी होतेय. आणि या जोडीकडून मेडलची अपेक्षा बाळगायला सध्यातरी काहीच हरकत नाही.

close