मंत्रालयाच्या आगीवरून अधिवेशनात गदारोळ

July 9, 2012 9:21 AM0 commentsViews: 1

09 जुलै

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व मुद्दे बाजूला सारून मंत्रालय आगीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची विरोधकांनी मागणी केली. आगीवर उद्या चर्चा करण्याचं सरकारनं आश्वासन दिलं पण विरोधक आजच चर्चा करा या मागणीवर ठाम होते. त्यामुळे गदारोळातच पहिल्या दिवसाचं काम तहकूब करण्यात आलं.

मुंबई मुसळधार पाऊस पडत असला.. तरी विरोधकांनी मात्र पहिल्याच दिवशी वातावरण तापवलं. कामकाज सुरु होताच मंत्रालयाच्या आगीची धग सभागृहात जाणवायला लागली. मंत्रालयाला आग लागलेली नसून ती लावल्याचा घणाघाती आरोप करत विरोधकांनी आगीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत सभागृह दणाणून सोडलं.

मंत्रालयाच्या आगीवर उद्या चर्चा होईल असं आश्वासन सरकारनं दिलं. पण चर्चा आजंच व्हावी या मागणीवर विरोधक ठाम होते. त्यामुळे गदारोळातच दोन्ही सभागृहांचं आजचं कामकाज तहकूब झालं.

पहिल्याच दिवशी आगीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं…पण आगीसारखे अनेक ज्वलंत मुद्दे यावेळी विरोधकांकडे आहेत. आणि त्यांना उत्तर कसं द्यायचं, याची रणनीती सरकार ठरवतंय. पण या लढाईत.. जनतेच्या पदरात काही विधायक पडेल, हा खरा धगधगता प्रश्न आहे.

close