पोलिसांच्या छळाला कंटाळून 321 लोकप्रतिनिधींचे राजीनामे

July 12, 2012 10:06 AM0 commentsViews: 2

12 जुलै

पोलिसांकडून होणारा त्रास आणि मायनिंग प्रकल्पाला सरकारने मान्यता दिल्याच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आक्रमक झाले आहे. कोरची तालुक्यातील 24 सरपंच आणि उपसरपंच, 29 पोलीस पाटील तसेच 114 ग्रामपंचायत समिती सदस्यांनी राजीनामे दिल्यानं या गावांमधील प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय. जिल्हात राजीनामे देणार्‍यांची संख्या 321 वर पोहोचली आहे.पोलिसांकडून होणारा त्रास, लोह खनिज मायनिंग प्रकल्पाला मान्यता या निषेधार्थ राजीनामे देत असल्याचं संघटनेनं सांगितलं. 29 जूनला कोरची तालुक्यात फुलगोंदी जंगलात नक्षल आणि पोलीस चकमक उडाली होती. त्यावेळी सी-60 कमांडो आणि सीआरपीएफ (CRPF) जवानांनी फुलगोंदीच्या पोलीस पाटलांना बेदम मारहाण केली होती. पण या प्रकरणी कुणावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलीस पाटलांनी राजीनामे दिल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान, या प्रकरणी बैठक बोलावण्यात आली असून त्यामध्ये प्रश्न सुटेल असा आशावाद अधिकार्‍यांनी व्यक्त केलाय.

close